
गणेशोत्सव काळातच शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे सत्र यंदाही काही कॉन्व्हेंट शाळांनी सुरू ठेकले आहे. परळ येथील सेंट पॉल शाळेने चाचणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱया गणेशोत्सव काळातच या परीक्षा घेण्यात येणार आहे. परळ, नायगाव, भोईवाडा या परीसरात राहणारे शेकडो मराठी विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असल्याने विद्याथी-पालकांमध्ये परीक्षेच्या वेळापत्रकामुळे नाराजी पसरली आहे. युवा सेनेने या प्रकरणाची दखल घेत परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे.
दरवर्षी शालेय शिक्षण विभागाच्यावतीने गणपती उत्सवादरम्यान शाळांना सुट्टी देण्यात येते. शैक्षणिक वेळापत्रकाप्रमाणे वर्षभरात 76 सुट्टय़ा होतील या हिशोबाने प्रत्येक शाळा सुट्टीचे नियोजन करत असते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे शाळा बंद असून विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. आधीच शाळा बंद त्यातच गणपतीसाठी अनेक विद्यार्थी आपल्या मूळ गावी गेले आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. परळ येथील सेंट पॉल कॉन्व्हेंट शाळेने पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या घटक चाचणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून ही परीक्षा 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. गणेश चतुर्थी दिवशी म्हणजेच 22 ऑगस्टला सुट्टी असून अन्य दिवशी 31 ऑगस्टपर्यत सलग परीक्षा होणार आहेत.
मुंबई विद्यापीठातील युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, शशिकांत झोरे, शीतल देवरूखकर-शेठ यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे गणेशोत्सवकाळात परीक्षा घेण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.





























































