
वांद्रे येथे सोमवारी एका रिकाम्या इमारतीचा भाग कोसळला होता. आज सकाळी मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणी भेट देऊन चालू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची तसेच जखमींना योग्य ती मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
वांद्रे पश्चिम येथील शेर्ले राजन मार्गावर रिकामी असलेल्या चार मजली इमारतीचा भाग बाजूच्या हार्दिक व्हिला इमारतीवर सोमवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास कोसळला. अग्निशमन दलाने ढिगाऱयाखाली अडवलेल्या दोघांची सुटका केली. यातील गंभीर जखमी झालेल्या ब्रुस मायकल डिफेना (41) यांचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. तर वांद्रे भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले अर्जुन रामासागर पंडित (25) यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मृत व्यक्तीच्या कुटुंबास 4 लाख रुपयांची मदत देण्यात येईल तर जखमी व्यक्तीस नियमानुसार अनुदानाची रक्कम देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.

























































