वजन कमी करण्यासाठी न्याहारीत करा पनीरचा वापर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी शरीरातील मेद कमी करण्याची गरज असते. त्यासाठी योग्य आहारासोबतच व्यायामाचीही गरज असते. दिवसाची चांगली आणि उत्साहवर्धक सुरुवात करण्यासाठी न्याहारीमध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. पनीरमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असल्याने न्याहारीत पनीरचा समावेश केल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर असून वजन कमी करण्यासही मदत होते.

रात्रीच्या झोपनंतर सकाळी शरीराला उर्जेची गरज असते. ती गरज पनीरमधून भरून निघते. तसेच सकाळी न्याहारी चांगली झाली की दिवसभर शरीरात उत्साह आणि उर्जा टिकून राहते. त्यामुळे सकाळच्या न्याहारीवर आहारतज्ज्ञ भर देतात. न्याहारीमध्ये पनीरचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन, जीवनसत्त्वे मिळतातच, त्याचसोबत बराचवेळ पोट भरलेले असल्याने भूक लागत नाही. त्यामुळे वारंवार खाण्याची गरज भासत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पनीर हळूहळू पचत असल्याने लवकर भूक लागत नाही. तसेच याच्या सेवनाने जीपीएल-1, पीवायवाय, सीसीके हे शरीराला आवश्यक असणार हार्मोन तयार होतात. तसेच पनीरमध्ये फॅट,लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्याने शरीरासाठी ते फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यासाठी न्याहारीत पनीरचा समावेश करणे फायदेशीर असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. सुमारे100 ग्रॅम पनीरमध्ये 1.2 ग्रॅम कर्बोदके असतात. पनीरमध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असल्याने ते वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. जास्त प्रोटीन आणि कमी कर्बोदके असल्याने पनीरच्या सेवनाने शरीरात मेद वाढत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते. तसेच 28 ग्रॅम पनीरमध्ये 82.5 कॅलरी असल्याने शरीराला आवश्यक असणारी उर्जाही त्यातून मिळते. तसेच पनीरमध्ये कॅल्शियम मुबलक असल्याने दात आणि हाडांच्या मजबुतीसाठी ते आवश्यक असतात. मधुमेही व्य़क्तींसाठी पनीर हा न्याहारीचा चांगला पर्याय आहे. तसेच पनीरच्या सेवनाने रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.