
यंदा बैल पोळ्यासह तान्हा पोळ्यावरही कोरोनाचे सावट असल्याने अनेक बालकांना घरी राहूनच तान्हया पोळ्याचा आनंद साजरा करावा लागला. याच पार्श्वभूमीवर भद्रावती येथील सुरक्षा नगरातील गावंडे परिवारातील बालकांनी तान्हा पोळ्यानिमित्त घरीच नंदीबैलाची आकर्षक सजावट केली व कोरोनावर आधारित देखावा निर्माण करून कोरोना योध्यांना सलाम केला.
नंदीबैल सजावटीच्या देखाव्यामध्ये वेदांती अमोल गावंडे या बालिकेने डॉक्टरची वेशभूषा करून आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश दिला. हार्दिक विशाल गावंडे या बालकाने पोलिसाची वेशभूषा करून नियमाचे पालन करण्याचे आवाहन केलं तर उन्नती अमोल गावंडे हिने स्वच्छता कर्मचाऱ्याची वेशभूषा करून स्वच्छता पाळण्याचा संदेश दिला. या सर्व कोरोना योध्यांना सर्व जनतेतर्फे गुंजन पिंपळकर व विधी आसुटकर या चिमुकल्यांनी सलामी दिली. भद्रावती येथील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते स्व. जगन्नाथराव गावंडे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी सार्वजनिक ठिकाणी भरणाऱ्या तान्हा पोळ्यात गावंडे परिवारातील बालकांचे समाजप्रबोधनपर देखावे सर्वांचे आकर्षण ठरत होते. यंदा मात्र टाळेबंदीमुळे ही दरवर्षीची परंपरा घरूनच पाळण्यात आली.
























































