देवरुखमधील बालिकाश्रमातल्या मुलींनी तयार केली मातीची गणेशमूर्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांना कोणी वाली नसतो त्यांना देवाचाच आधार असतो. अनाथांच्या नाथा तुज नमो असे म्हणत देवरुख मातृमंदिर गोकुळ बालिकाश्रमातील दहा मुली दिड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करणार आहेत. यासाठी या मुलींनी चक्क मातीची गणेशमूर्ती तयार केली आहे व तीचेच पुजन चतुर्थीला होणार आहे.

गेली अनेक वर्ष गोकुळ बालीकाश्रमात गणेशोत्सवात दिड दिवस गणेशाची आराधना केली जात आहे. या मुलींना हे बालिकाश्रम हाच एक आधार असल्याने या मुली एकजुटीने आपला आनंद शोधत असतात व त्यातच रममाण होत भविष्याची स्वप्ने रंगवली जात असतात. दिड दिवसाच्या गणेशोत्सवासाठी या मुलींनी माती आणुन गणरायाची सुबक मूर्ती तयार केली. रंगकामही करुन चतुर्थीला ही गणेशमूर्ती विराजमान होणार आहे. गोकुळ बालिकाश्रम ते बेर्डे सभागृह अशी ही गणेशमूर्ती आणली जाणार आहे.कोरोना काळात सर्व नियम पाळुन हा उत्सव या मुली साधेपणाने पार पाडणार आहेत.

साधेपणाची आरास करुन रांगोळ्या रेखाटुन आरती, गणेशाची गाणी म्हणत या मुली बुद्धीचा देवता श्री गणरायाची आराधना करणार आहेत. दिड दिवस या मुली गणरायाच्या सेवेत रममाण होणार आहेत. या मुलींना अभिजित हेगशेट्ये, आत्माराम मेस्त्री, अंकीता चौगुले यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या दिड दिवसाच्या गणेशोत्सवाचे परिसरातुन विशेष कौतुक होत आहे.