
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-कश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा काढून घेण्याबद्दल कोणतेही संकेत दिले नव्हते. अचानक कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या सरकारवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. एकही दिवस असा उगवत नाही की ज्यादिवशी हे सरकार खोटे बोलत नाही. हा देश आता महात्मा गांधींचा राहिलेला नाही, अशा कडवट शब्दांत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुक अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
कलम 370 हटवण्याचा निर्णय अनपेक्षित होता. त्याच्या एक दिवस अगोदरच मी पंतप्रधानांना भेटलो होते. पण त्यांनी याबद्दल चकार शब्द काढला नाही. कश्मिरात मोठय़ा प्रमाणावर जवान कशासाठी पाठवण्यात येत आहेत असा प्रश्नही मी विचारला होता. परंतु मला उत्तर मिळाले नाही. पर्यटकांना कश्मिरातून बाहेर काढण्यात आले. अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली. हे सारे आश्चर्यजनक होते असे डॉ. अब्दुल्ला म्हणाले.





















































