‘हा’ खेळाडू संघात असता तर टीम इंडियाने 2019 चा वर्ल्डकप जिंकला असता, सुरेश रैनाचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 च्या एक दिवसीय वर्ल्डकपचा मानकरी म्हणून टीम इंडियाचे नाव आघाडीवर होते. विराट, रोहित, धवन, धोनी सारखी दमदार फलंदाजी आणि बुमराह, शमी सारखा वेगवान मारा, चहल, कुलदीप ही फिरकीची जोडी आणि पंड्यासारखा अष्टपैलू असताना सर्वांना टीम इंडिया बाजी मारणार असे वाटत होते. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. मात्र नुकताच निवृत्त झालेला सुरेश रैना याने टीम इंडियात अंबाती रायडू असता तर वर्ल्डकप जिंकला असता असा दावा केला आहे.

‘क्रीकबझ’ बोलताना सुरेश रैना म्हणाला, टीम इंडियात चौथ्या स्थानासाठी अंबाती रायडू संघात हवा होता असे मला वाटते. जवळपास दीड वर्ष त्याने यासाठी मेहनत घेतली होती आणि चांगली कामगिरी देखील केली होती. मात्र त्याला संघात स्थान मिळाले नाही.

विशेष म्हणजे वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीपासून टीम इंडियात चौथ्या स्थानासाठी डोकेफोड सुरू होती. स्पर्धेत रायडूच्या जागी विजय शंकरची निवड करण्यात आल्याने वाद झाला होता. रायडूने तडकाफडकी निवृत्ती देखील घेतली. मात्र स्पर्धेत सलामीवीर खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याने चौथ्या स्थानाचे महत्व जाणवले नाही. मात्र सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सलामीवीर झटपट बाद झाल्याने मधल्या फळीतील फलंदाजांची उणीव समोर आली.

याबाबत बोलताना रैना म्हणाला की, रायडू चौथ्या स्थानासाठी चांगला फलंदाज होता. जर तो टीम इंडियाचा सदस्य असता तर आपण वर्ल्डकप जिंकला असता. तो ज्या पद्धतीने खेळतो त्याच्यासाठी नंबर 4 सर्वोत्तम पर्याय होता, असेही रैना म्हणाला.