एमयूटीपी-3 ला एशियन बँकेकडून 3500 कोटींचे कर्ज मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय कॉरीडॉर, ऐरोली ते कळवा एलिवेटेड लिंक आणि 47 वातानुकूलित प्रकल्पाचा समावेश असलेल्या एमयूटीपी-3 प्रकल्पाला एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकेकडून सुमारे (पाचशे अमेरिकन डॉलर) 3500 कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प तीन हा एकूण अंदाजित 10,947 कोटी रूपयांचा प्रकल्प आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँक यांच्यात 500 दशलक्ष डॉलरच्या कर्ज पुरवठ्यासंदर्भात आज करार करण्यात आला. केंद्रिय अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव समीर कुमार खरे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर.एस.खुराणा आणि बँकेचे संचालक रजत मिश्रा यांच्या हा करार करण्यात आला.

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकने हे लोन फेडण्यासाठी पाच वर्षांची वाढीव मुदत दिली असून एकूण 30 वर्षांच्या कालावधीचे हे कर्ज असणार आहे. उपनगरीय रेल्वे यंत्रणेची गुणवत्ता आणि सुरक्षितता तसेच उपनगरीय लोकलचे नेटवर्क क्षमतेत त्यामुळे वाढ होण्यास मदत होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.