कोपरगावात व्यावसायिकाचा खिसा कापला; सव्वा लाख लांबवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकेत पैसे भरण्यासाठी जात असलेल्या व्यावसायिकाकडे लिफ्ट मागत गाडीवर बसत अज्ञात चोरांनी त्याचा खिसा कापल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी व्यावसायिकाच्या खिशातील 1 लाख 24 हजार 600 रुपये लांबवले आहेत. ही घटना कोपरगावातील एसबीआय बँक खंदकनाला शाखा येथे मंगळवारी सकाळी 10.30 ते 11.30 वाजता घडली.

समीर अकबर रंगरेज ( वय 36, रा. येवला नाका) यांचा भंगारचा व्यवसाय आहे. ते मंगळवारी स्टेट बँकेच्या खंडकनाला शाखेत पैसे भरण्यासाठी गेले असता तुम्हाला मुख्य शाखेतून ही रक्कम भरावी लागेल, अशी माहिती कॅशियरने दिली. त्यानंतर गोदाम गल्लीतील मुख्य शाखेत पैसे भरण्यासाठी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने मलाही गोदाम गल्लीतील स्टेट बँकेत पैसे भरायचे असल्याने तुमच्या बरोबर येऊ द्या, अशी विनंती केली. तो आणि त्याचा मित्र माझ्या ॲक्टिवा गाडीवर बसले त्यांनी मला गाडी साई कॉर्नरकडे घेण्यास सांगितले. तिकडे गेल्यानंतर गाडी थांबविण्यास सांगितले. त्यावेळी माझ्यामागे बसलेल्या अज्ञात चोरटयाने माझ्या खिशात हात घालून 1 लाख 24 हजार 600 रुपये काढले. त्यानंतर ते दोघे पळू लागले. आपण त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते सापडले नाहीत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास वडगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.स.ई. बी. सी. नागरे करीत आहेत.