महाड इमारत दुर्घटना : शेवटचा मृतदेहही सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाडच्या काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत पत्त्यांप्रमाणे सोमवारी कोसळल्यानंतर मंगळवारी दिवसभर ढिगारे उपासण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. बुधवारी सकाळी शेवटचा मृतदेह काढण्यात शोध पथकाला यश आलं. कामरून अन्सारी (वय 80) असे मृत महिलेचे नाव आहे.

दरम्यान, या घटनेमध्ये आतापर्यंत 16 मृत आणि 2 जिवंत व्यक्ती बाहेर काढण्यात आल्या आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख, जखमींना 50 हजार

महाडमधील इमारत दुर्घटनेप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्या बुधवारी बैठक होणार असून त्यात अधिक मदत देण्याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, तर जखमींना वाऱ्यावर सोडणार नसून त्यांना अधिकाधिक चांगली आरोग्य सुविधा देणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.