नाटय़गृहांचा पडदा सुरक्षितपणे उघडावा…‘एसओपी’साठी विशेष समितीची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुरक्षिततेचा वावर ठेवून नाटय़गृहे कशी सुरू करता येईल, त्यासाठी मार्गदर्शक तत्वे काय असावीत यासाठी मराठी व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाच्या पुढाकाराने नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत नाटय़ व्यवसायासंदर्भात नाटय़ परिषदेच्या समन्वयाने ‘एसओपी’ तयार करून शासनाशी लवकरात लवकर चर्चा करण्याचे ठरले आहे. यासाठी नाटय़ परिषदेच्या घटक संस्थांच्या सदस्यांची विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.

यशवंत नाटय़मंदिर येथे झालेल्या बैठकीला कलाकार संघ, रंगमंच कामगार संघ व व्यवस्थापक संघ या नाटय़ परिषदेच्या घटक संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नाटय़ व्यवसाय पूर्ववत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्यांवर विचारविनिमय करण्यात आला. यासंदर्भात सरकारसोबत चर्चा करण्यासाठी  ‘विशेष समिती’ गठीत करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. ही समिती नाटय़ परिषदेशी समन्वय साधून नाटय़ व्यवसायसंदर्भात एसओपी नक्की करेल. तसेच सरकारसोबत लवकरात लवकर बैठक  घेऊन निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती निर्माता संघाचे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी दिली.

विशेष समितीतील सदस्यांची नावे

मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाचे संतोष काणेकर, ज्ञानेश महाराव, राहुल भंडारे, देवेंद्र पेम, भरत जाधव, ऐश्वर्या नारकर हे सदस्य; कलाकार संघाचे  प्रदीप कबरे, शरद पोंक्षे, सुशांत शेलार, वंदना गुप्ते; रंगमंच कामगार संघाचे रत्नकांत जगताप, संदीप नगरकर, किशोर इंगळे, प्रवीण गवळी, बापू सावळ, उल्लेश खांदारे, सतीश खकतोडे, रुचिर चव्हाण, आतिश कुंभार आणि व्यवस्थापक संघाचे प्रभाकर (गोटय़ा) सावंत, हरी पाटणकर, नितीन नाईक, नंदू पणशीकर सदस्य आहेत.