
उत्तर प्रदेशात सध्या बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून बहुजन समाज पार्टीचे बाहुबली आमदार आणि कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी यांचे लखनौतील बेकायदा निकासस्थान जमीनदोस्त करण्यात आले. लखनौ विकास प्राधिकरणाने ही मोठी कामगिरी गुरुवारी पार पाडली. आमदार मुख्तार अन्सारी हे उत्तर प्रदेशातील पूर्वांचलच्या मऊ विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्त्व करतात. यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने बाहुबली अन्सारी यांच्या वाराणसी, मऊ आणि गाजीपूर येथील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला आहे. आता ही अवैध बांधकामे तोडण्याचा खर्च आमदार अन्सारी यांच्याकडून वसूल केला जाणार आहे. याशिवाय या बांधकामांना संरक्षण देणाऱया अधिकारी आणि कर्मचाऱयांवर कडक कारवाई करण्याचे संकेत योगी सरकारने दिले आहेत.





























































