
नागरिकांना आपल्या शासकीय कामकाजाचे दस्तावेज, विविध अर्ज यांची सद्यस्थिती कळावी म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रांत कार्यालयात व्हाट्सऍप ग्रीव्हन्स रिड्रेसल कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
कोवीड प्रादुर्भाव लक्षात घेवून बहुसंख्य कामे ऑनलाइन करण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील नाशिक, कळवण, दिंडोरी, इगतपुरी, सटाणा, येवला, मालेगाव, निफाड, चांदवड या प्रांत कार्यालयात व्हाट्सऍप ग्रीव्हन्स रिड्रेसल कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्जदारांना आपल्या शासकीय कामकाजाचे दस्तावेज, अर्ज कुठल्या स्तरावर आहेत याची माहिती घरबसल्या व्हाट्सऍपद्वारे मिळणार आहे.
जिल्हास्तरावर गेल्या सहा महिन्यांपासून ही सुविधा कार्यरत होती. आजपर्यंत १६ पेक्षा जास्त लोकांनी याचा लाभ घेतला. ही सुविधा केवळ जिल्हास्तरावर मर्यादित न ठेवता उपविभाग स्तरावरही उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल अधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
प्रत्यक्ष प्रांत अथवा तहसील कार्यालयात न येता खालील व्हाट्सऍप क्रमांकाद्वारे आपल्या शासकीय कामाचा पाठपुरावा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
असा करा व्हाट्सऍपवर अर्ज
नागरिकांनी आपले नाव, पत्ता व संपर्क क्रमांक लिहून त्याखाली ज्या कार्यालयात मूळ अर्ज केला आहे त्या कार्यालयाचे नाव, अर्जाचा विषय, दिनांक हा तपशील व मूळ अर्जाचा व्यवस्थित फोटो संबंधित कार्यालयाच्या व्हाट्सऍप क्रमांकावर पाठवावा.
उपविभागीय अधिकार्यांचे व्हाट्सऍप क्रमांक पुढील प्रमाणे :-
नाशिक – ९४२१५५०७९९;
कळवण – ९४२१५५०८१२;
दिंडोरी – ९४२१५५०८२२;
इगतपुरी – ९४२१५५०८५२;
सटाणा – ९४२१५५०८९३;
येवला – ९४२१५५०९०७;
मालेगाव – ९४२१५५०९२७;
निफाड – ९४२१५५०९३७;
चांदवड – ९४२१५५०९४७.





























































