
लाखो-करोडो शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले खोपोलीतील ‘रमाधाम’ वृद्धाश्रम आता नव्या दिमाखदार स्वरूपात उभे राहिले आहे. रमाधाम अत्याधुनिक सुविधांनी नव्याने बांधण्यात आले असून निसर्गाच्या सानिध्यात आजी-आजोबांचे आयुष्य आणखी आनंददायी होणार आहे. या नव्या वास्तूचा लोकार्पण सोहळा शनिवारी सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून भारतरत्न लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुढाकाराने खोपोलीत 19 जून 1990 रोजी ‘रमाधाम’ बांधण्यात आले. वृद्धांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी आवश्यक त्या सर्व सुविधा तिथे उपलब्ध करून दिल्या. स्वच्छ, मोकळी हवा आणि उल्हासदायक वातावरण यामुळे थोडयाच वर्षात रमाधाम लोकप्रिय झाले. वृद्धांना हक्काचे जणू नवे घरच मिळाले. संपूर्ण कारभार पाहण्यासाठी चंद्रकांत वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती रमाबाई केशव ठाकरे ही विश्वस्त संस्था स्थापन करण्यात आली.
यूटय़ुबवर पाहता येणार
काळाच्या ओघात आणखी चांगल्या सुविधा देण्यासाठी ‘रमाधाम’ चा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तळ अधिक तीन मजल्यांची भव्य, देखणी इमारत बांधण्यात आली असून त्याचे लोकार्पण शनिवारी होणार आहे. या कार्यक्रमात ‘गप्पाष्टक’ कार संजय उपाध्ये, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिरमुले आदी सहभागी होणार आहेत. हा लोकार्पण सोहळा यूटय़ुबवर प्रत्यक्ष पाहता येणार असून या कार्यक्रमात सर्वांनी ऑनलाइन सहभाग घ्यावा असे आवाहन ‘रमाधाम’ चे अध्यक्ष व निमंत्रक चंदूमामा वैद्य यांनी केले आहे.

























































