
बंगळुरू शहर पोलिसांच्या पथकाने दोन दुर्मिळ कासव आणि एक दुर्मिळ दगड गुप्तपणे छापा टाकून पकडले होते. कासवांमुळे भरभराट होते, असे ताब्यात घेतलेल्या संशयितांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या मनावर बिंबवले. त्यावर पोलीस अधिकाऱ्यांचा विश्वास बसला. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेले कासव संपत्ती मिळण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी चक्क पोलीस ठाण्याच्या आवारत ठेवले असल्याचे उघड झाले आहे.
बदरहल्ली शहर पोलिसांनी 22 ऑगस्टला मगडी रोडवर 1 किलो वजनाच्या हिरव्या दुर्मिळ दगडाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीनजणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे दोन दुर्मिळ जातीची कासवेही आढळली. ही दोन दुर्मिळ कासव या तस्करांकडे कोठून आले, याबाबतची माहिती मिळालेली नाही. या प्रकरणातील चौथा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याचा शोध घेण्यात येत आहे. त्याला अटक केल्यानंतरच या कासवाबाबत अधिक माहिती मिळणार आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या कारवाईच्या नोंदीतमध्ये फक्त हिरव्या जातीचा दुर्मिळ दगड जप्त करून तीनजणांना अटक केल्याचे नमूद केले होते.
कासव जवळ बाळगल्याने भरभराट होते, असे संशयितांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. त्यावर पोलीस अधिकाऱ्यांचा विश्वास बसल्याने त्यांनी जप्तीच्या कारवाईत कासवांची नोंद केली नाही. त्यांनी जप्त केलेली कासव पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ठेवली. जप्त केलेले कासव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठेवल्यास भरभराट होईल, असे अधिकाऱ्यांना वाटत होते. त्यामुळे कारवाईच्या नोंदीत तीनजणांना ताब्यात घेऊन रिक्षा ताब्यात घेतल्याचे नमूद केले होते. जप्त केलेले कासव पोलीस ठाण्याच्या आवारातील सिंमेटच्या टाकीत ठेवले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर वरिष्ठांना कळवण्यात आले, त्यांनी या घटनेची पुष्टी केली असून वनविभागाला याबाबत कळवण्यात आले आहे. वनविभागाकडे हे दोन कासव सोपवण्यात येणार आहेत.





















































