केंद्र सरकारचे अनलॉक 4 -7 सप्टेंबरपासून मेट्रो सुरू; सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने अनलॉक- 4 जाहीर करताना शाळा, महाविद्यालये 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहतील, असे म्हटले आहे. तर, मेट्रो सेवा 7 सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत. दरम्यान, कोरोनाबाबतची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना असणार आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठविण्यात येत आहे. अनलॉक-3चा टप्पा 31 ऑगस्टला संपत असल्याने केंद्र सरकारने आज अनलॉक-4च्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत अनलॉक-4 असणार आहेत. मात्र, कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम राहणार आहे.

हे सुरु होणार

  • मेट्रो सेवा 7 सप्टेंबरपासून ग्रेड पद्धतीने सुरु होणार आहे.
  • सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा कार्यक्रम 21 सप्टेंबरपासून सुरु होतील. मात्र, केवळ शंभर जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.
  • राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर  ई-परमिटची गरज लागणार नाही.
  • इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीनेच शाळेत जाता येईल.

हे बंद राहणार

  • शाळा, महाविद्यालये 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार.
  • चित्रपटगृहे, स्विमिंग पुल, थिएटर्स बंद.
  • कन्टेन्मेंट झोनमध्ये बंधने कायम. येथे 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन राहणार.
  • आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंदच.
  • यापुढे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार.