‘परीक्षा पे चर्चा’ करण्याऐवजी पंतप्रधान ‘खिलौनो पे चर्चा’ करताहेत, राहुल गांधींची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
narendra-modi-rahul-gandhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी खेळण्यावरही चर्चा केली. यावर काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. JEE-NEET परीक्षा देणारे विद्यार्थी परीक्षा पे चर्चा करण्यासाठी उत्सुक असताना पंतप्रधान मात्र खेळण्यावर चर्चा करत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

‘JEE-NEET चे उमेदवार पंतप्रधान मोदींकडून ‘परीक्षा पर चर्चा’ करण्याची अपेक्षा लावून बसले होते, मात्र मोदींनी ‘खिलौनो पे चर्चा’ केली’, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. कोरोना संकटकाळात JEE-NEET परीक्षा घेण्यास राहुल गांधी विरोध करत आहेत. तसेच बिगर भाजपशासित राज्याच्या 7 मुख्यमंत्र्यांनी देखील यास विरोध केला आहे.

काय म्हणाले मोदी?
‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी खेळण्यावर चर्चा केली. ‘मन की बात’ ऐकल्यानंतर लहान मुलं नवं-नवीन खेळण्याची मागणी करतील यासाठी मी आई-वडिलांची क्षमा मागतो, असे मोदी म्हणाले. खेळणे आपल्या महत्वकांक्षा वाढवण्यासाठी प्रभावी आहेत. खेळणे फक्त मनाला समाधान देत नाही, तर महत्वकांक्षा देखील ठरवतात, असेही मोदी म्हणाले. देशात उत्तमोत्तम खेळण्या बनवणारे कारागीर आहेत. आपल्या देशात खेळण्याची 7 लाख कोटींची उलाढाल होते, मात्र यात आपला हिस्सा कमी आहे. त्यामुळे स्वदेशी खेळण्या बनवण्यावर भर द्यावा, असे आवाहन मोदींनी केले.