आज बाप्पाच्या आरत्यांचा गजर घुमणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती बाप्पा मंगळवारी आपल्या गावी जातील आणि मग खरोखरच भक्तांना चैन पडणार नाही. कोविडच्या संकटात सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियम पाळून भक्तांनी, मंडळानी लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केली. मंगळवारी बाप्पाचे विसर्जन होईल, पण मिरवणूक नसेल, गर्दी नसेल. असतील ते फक्त डोळय़ांत अश्रू! उद्या सोमवारी मंडपात बापपाची महाआरती होईल आणि आर्त विनवणी होईल… बाप्पा या कोविडच्या संकटातून अवघ्या विश्वातून मुक्त कर!!

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. घराघरात, सार्वजनिक मंडळांच्या मंडपात बाप्पाचे आगमन झाले. दहा दिवस पुजा-अर्चाही झाली. मात्र सारे काही सुरू होते ते कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये याची काळजी घेऊनच. मूर्तींची उंची कमी झाली हे खरे असले तरी प्रार्थनेची उंची कमी झाली नव्हती. दहा दिवस कुठे आरोग्योत्सव साजरा झाल, रक्तदान शिबिरे झाली, गरिबांना धान्यवाटप झाले, कोविड योद्धांचा सत्कारही झाला.

सोशल डिस्टन्सिंग पाळून बाप्पाची आरतीही झाली. सोमवारी आता महाआरती होईल. कार्यकर्ते पुन्हा एकदा टिपेचा सूर लावतील, मनापासून बाप्पाची आळवणी करतील… हे विघ्नहर्ता, कोरोनाचे हे विघ्न लवकरात दूर कर! पुढच्या वर्षी लवकर ये… तुझा उत्सव दणक्यात साजरा करू!!

445 विसर्जन स्थळे, 23 हजार कर्मचारी

पालिकेने एकूण 445 विसर्जन स्थळे आणि 23 हजार कर्मचाऱयांसह संपूर्ण यंत्रणा तैनात ठेवली आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी खबरदारी म्हणून भाविकांनी गर्दी करू नये, मिरवणूक टाळावी, कृत्रीम तलावात मूर्तींचे विसर्जन करावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन पालिकेने केले आहे. भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे असे आवाहन पालिकेने केले आहे. याशिवाय मुंबई शहरात एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तर 1 ते 2 किलोमीटर अंतरातील गणेश भक्तांनी मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक विसर्जनस्थळी उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱयांकडे आपल्या मूर्ती विसर्जनासाठी द्याके असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर महापालिकेद्वारे अतिरिक्त मनुष्यबळ देऊन मूर्ती संकलनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळांवरील गर्दी कमी होण्यासाठी महापालिकेच्या 24 विभागांमध्ये सुमारे 168 कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्यात आले आहेत.

प्रत्येक विभागात 8 गणेशमूर्ती संकलन केंद्रे

पालिकेच्या प्रत्येक विभागांतर्गत 7 ते 8 गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. त्याची माहिती तसेच कृत्रिम तलावांची माहिती पत्त्यासह तसेच गुगल लोकेशनसह महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात असणाऱ्य़ा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. तर सिल्ड इमारतींमधील गणेशमूर्तीचे विसर्जनासाठी घरीच व्यवस्था करावयाची आहे. विसर्जनासाठी मूर्ती पालिकेकडे देताना पूजा-आरती घरी, मंडपातच करावयाची आहे.