तथागत गौतम बुद्धांनाही कम्युनिस्ट नियमांच्या चौकटीत बसवण्याचा ड्रॅगनचा मनसुबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विस्तारवादी आणि हुकूमशाही कम्युनिस्ट राजवट आता स्वायत्त तिबेटवरही लादण्याचे संकेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले आहेत. पवित्र बौद्ध धर्माच्या पायावर उभारलेल्या तिबेटला आता फसव्या समाजवादी धोरणांचा रंग फासून आपली राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे चीनने ठरवले आहे. तिबेटच्या बौद्ध विचारधारणेला चिनी कम्युनिस्ट राजवटीच्या नियमानुसार रूप द्या आणि तिबेटमध्ये आधुनिक समाजवादाचे राज्य आणा, असे आवाहन राष्ट्रध्यक्ष जिनपिंग यांनी तिबेटवासीयांना केले आहे. अर्थात या आवाहनाआड चीनचा तिबेटवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा हेतू स्पष्ट झाला आहे.

आठव्या शतकात तिबेटमध्ये बौद्ध धर्माचा प्रास झाला. तेव्हापासून 19व्या शतकापर्यंत तिबेटने आपले स्वातंत्र्य कायम राखले होते. पण नेपाळविरुद्धच्या युद्धात पराभूत झाल्यावर नेपाळने लादलेला वार्षिक 5 हजार रुपयांचा दंड भरायला लागू नये म्हणून तिबेटी शासकांनी चीनची मदत मागितली.चीनने तिबेटला नेपाळविरुद्ध विजय मिळवण्यासाठी मदत केली. पण निसर्गरम्य तिबेटवर 1907 पासून आपला कब्जा प्रस्थापित केला. चीनच्या दडपशाहीमुळे अखेर तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना पलायन करून हिंदुस्थानात राजाश्रय घ्यावा लागला. त्यानंतरही चीनच्या परवानगीने तिबेटमध्ये स्वायत्त प्रशासन या भागातील नागरी कामांची पूर्तता करीत आहे. पण चीनला आता धार्मिक तिबेटचे स्वरूप पूर्ण बदलायचे आहे. त्यासाठी जिनपिंग सरकारने तिबेटवर साम्यवादी राज्यप्रणाली लादण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 1912 मध्ये तिबेटने स्वतःला स्वायत्त आणि स्वतंत्र राष्ट्र घोषित केले होते. पण 1951  पासून चीनने पुन्हा तिबेटवर आपली साम्यवादी दडपशाही सुरू करीत या देशावर कब्जा मिळवला. धर्मगुरू दलाई लामा यांनी चीनच्या या दडपशाहीविरुद्ध लढा देऊनही चीन आपला हेका सोडलेला नाही.

आम्हाला तिबेटमध्ये शांतता, विकास आणि प्रगतीचे राज्य आणायचे आहे. मात्र त्यासाठी तिबेटी जनतेने आपल्या बौद्ध विचारधारेला चीनच्या धोरणानुसार नवे स्वरूप द्यायला हवेय. आम्हाला आधुनिक समाजवादी तिबेट घडवायचा आहे. त्यासाठी तिबेटी नागरिकांचे सहकार्य मात्र गरजेचे आहे. – शी जिनपिंग,  चीनचे राष्ट्राध्यक्ष