
कोरोनाचा जगभरात थैमान सुरू असल्याने अनेक पर्यटन स्थळे बंद आहेत. तर बऱ्याच ठिकाणी अन्य देशातील नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र एक बेट असे आहे जिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी एक अजब अट घालण्यात आली आहे. या बेटावर फिरायला यायचे असल्यास तुम्ही कोरोनातून बरे झालेले असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या बेटावर प्रवेश मिळेल.
ब्राझीलचं फर्नांडो डी नोरोन्हा (Fernando de Noronha) नावाचे एक बेट पर्यटकांसाठी गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. पण आता मात्र नवीन अटींसह हे बेट पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.
या बेटावर मर्यादित पर्यटकांना प्रवेश दिला जातो. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, सप्टेंबरपासून अटींची पूर्तता करणाऱ्या पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बेटावर राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक नवीन अट घालण्यात आली आहे. पर्यटकांना कोरोना व्हायरस लागण होऊन ते त्यातून पूर्ण बरे झालेले असावे. तसेच त्यांचा रिपोर्ट किमान 20 दिवस पूर्वीचा असणे आवश्यक आहे. तसेच, बेटावर येण्यासाठी पर्यटकांना पर्यावरण कर भरणे आवश्यक आहे.
नैसर्गिक सौंदर्याने हे बेट नटलेलं आहे. हिरवेगार बेट, निळाशार समुद्र, नितळ पाणी असं नैसर्गिक सौंदर्य या बेटाला लाभलेलं आहे. नॅशनल मरीन रिझर्व्ह अशी या बेटाची ओळख आहे. इथं जगभरातून पर्यटक येतात. या बेटाचा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये देखील समावेश करण्यात आला आहे.

































































