
वुशू हा कुंफू अन् मार्शल आर्टचाच एक प्रकार. वु म्हणजे युद्ध आणि शू म्हणजे कला. हिंदुस्थानातही हा खेळ आता झेप घेऊ लागलाय. कुलदीप हांडू यांना नुकताच द्रोणाचार्य हा देशातील मानाचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दैनिक ‘सामना’ने ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे सेक्रेटरी सोपान कटके यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले, या खेळामध्ये मुंबईसह महाराष्ट्राचे खेळाडू चमकदार कामगिरी करताहेत. आता महाराष्ट्रातील 33 जिह्यांमध्ये हा खेळ खेळला जात आहे. हिंदुस्थानचा संघही आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवतोय. युथ ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश करण्यात आलाय. ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश व्हावा याचीच प्रतीक्षा लागून राहिलीय. जेणेकरून हिंदुस्थानला या खेळामधूनही पदकांची कमाई करता येईल, असा विश्वासही पुढे त्यांनी व्यक्त केलाय.
ऑनलाइन स्पर्धांना दणदणीत प्रतिसाद
कोरोना व लॉकडाऊनमुळे इतर खेळांप्रमाणे याही खेळावर परिणाम झाला. वुशू हा बॉडी कॉण्टॅक्ट खेळ. त्यामुळे साहजिकच या खेळाचा सराव व स्पर्धा लवकर सुरू होणार नाही हे माहीत होते. त्यामुळे राज्य व राष्ट्रीय स्पर्धा ऑनलाइन स्तरावर घेण्यात आल्या. या स्पर्धांसाठी खेळाडूंकडून प्रवेश फीही घेण्यात आली नाही. या स्पर्धांना खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभला, असे उद्गार सोपान कटके यांनी यावेळी काढले.
वुशू दोन प्रकारांत खेळला जातो
वुशू हा खेळ दोन प्रकारांत खेळला जातो. ताओलू व सांदा या दोन प्रकारांत खेळाडू पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. सांदा म्हणजे मॉर्डन फायटिंग मेथड. या प्रकारात खेळाडू किकबॉक्सिंग, बॉक्सिंग, मुए थाई यांसारख्या बाबींचा वापर करू शकतात. ताओलू या प्रकारात शॉर्ट वेपन, लाँग वेपन व बेअरहॅण्ड यांचा समावेश असतो. हिंदुस्थानात या खेळाच्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धा होतातच. पण याचसोबत अखिल हिंदुस्थानी पोलीस, आंतरशालेय, आंतरविद्यापीठ याही स्पर्धा खेळवल्या जातात. याशिवाय आशियाई, जागतिक व दक्षिण आशियाई स्पर्धेतही खेळाडू जिवाचे रान करीत असतात, असे सोपान कटके यांनी आवर्जून सांगितले.
संरक्षण विभागासोबत केंद्राच्या इतर डिपार्टमेण्टमध्येही खेळाडूंना नोकऱ्या मिळणार आहेत
वुशू या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेत जवळपास 42 संघ सहभागी होतात. यावरूनच हा खेळ हिंदुस्थानात लक्षणीय प्रमाणात खेळला जातो याची प्रचीती मिळते. तसेच याआधी या खेळातील खेळाडूंना देशातील संरक्षण विभागात नोकरी मिळत होती. आता केंद्र सरकारच्या इतर विभागांतही खेळाडूंना नोकऱया मिळणार आहेत. ही बाब नक्कीच आनंदाची आहे. सध्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सीआरपीएफ यांसारख्या ठिकाणी वुशू खेळातील खेळाडू नोकरी करीत आहेत, असे सोपान कटके यांनी स्पष्टपणे सांगितले.
अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू
संध्याराणी, बिमोलजीत सिंग, सनाथोई देवी, पूजा काध्यान
द्रोणाचार्य पुरस्कार विजेता
कुलदीप हांडू
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले महाराष्ट्राचे खेळाडू
श्रावणी कटके, तृप्ती चांदवडकर, मिताली वाणी, शांती राठोड , प्रतीक्षा शिंदे, असलेशा कांबळे, कल्याणी जोशी, सलोनी जाधव, खुशी तेलकर, स्वयम कटके, ओमकार पवार, संदीप शेलार, अथर्व मोडक, आदित्य नायर, तेजस कोंडे, राज मल्हार व्हटकर, सिद्धी शिंदे, ओमकार मोडक
शिव छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू
केतकी कदम, शांती राठोड, प्रतीक्षा शिंदे, संदीप शेलार, तेजस कोंडे, ओमकार पवार, सुरज सोनकांबळे, श्रावणी सोपान कटके, शुभम जाधव, प्रियंका गौडा, सोपान कटके

























































