
कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगची मोहिम राबविली जात आहे. कोरोना रुग्ण आणि त्याच्या संपर्कात आलेल्यांचा या माध्यमातून शोध घेतला जात आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून आता घरोघरी जाऊन कोरोना रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकतीच तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक झाली असून या बैठकीत घरोघरी जाऊन कोरोनाचा शोध घेण्यासाठी राज्यव्यापी मोहीम हाती घेण्याबाबत एकमत झाले आहे.
कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांतून मुंबईसारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या शहरातील कोरोना नियंत्रणात आला. धारावी, वरळी भागातील कोरोना रुग्णांची संख्या नगण्य झाली. याच धर्तीवर आता ग्रामीण भागात पसरणारा कोरोनाही नियंत्रणात आणायचा आहे. यासाठी आता अशासेविका, आमदार, नगरसेवक तसेच लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून घरोघरी जाऊन कोरोनाचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती, लोकसहभाग, आरोग्य शिक्षण, चाचण्यांची व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. यासंदर्भात टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, डॉ. अविनाश सुपे, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित यांच्याशीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे.
मुंबईतील जे. जे. रुग्णालय व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले डॉ. सचिन गुप्ते हे उत्तर प्रदेशमधील आरोग्य विभागाचे प्रमुख सल्लागार आहेत. कोरोना रुग्णांचा घरोघरी शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये ‘दस्तक’ योजना राबविण्यात आली. ही योजना तिथे यशस्वी ठरली असून याबाबत डॉ. सचिन गुप्ते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. रुग्ण शोधमोहिम व त्याचे परिणाम याविषयी डॉ. गुप्ते यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. याच धर्तीवर महाराष्ट्रातही योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तज्ज्ञांच्या बैठकीत दिले.
सप्टेंबरच्या मध्यापासून योजनेची सुरुवात
मुंबईसह प्रामुख्याने महाराष्ट्राच्या अन्य भागांत वाढणारा कोरोना रोखण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे. याच महिन्यात ही योजना कार्यरत करण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे. सप्टेंबरच्या मध्यापासून ही योजना सुरू होण्याची शक्यता असून यासाठी आमदार , नगरसेवक यांच्याशी संपर्क साधला जाणार आहे.
महाराष्ट्रात ही योजना राबविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सूचना आल्यानंतर तत्काळ ती राबविली जाईल. – डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण संचालक
उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक घर पिंजून काढत कोरोना रुग्ण शोधण्यात आले. एवढ्या मोठ्या राज्यात ‘दस्तक’ ही योजना यशस्वी ठरली. या योजनेचे प्रमुख सल्लागार डॉ. गुप्ते यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यासंदर्भात मुंबईत भेट घेतली आहे. अशाच प्रकारची योजना महाराष्ट्रात राबविण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले असून याच महिन्यात ती राबविण्यास सुरुवात होईल. – डॉ. संजय ओक, प्रमुख कोरोना टास्क फोर्स























































