
गेल्या दोन दिवसांपासून आंध्र प्रदेशात कुख्यात नक्षलवादी मुप्पाला लक्ष्मण राव उर्फ गणपती हा पोलिसांसमोर आत्मसपर्पण करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राव हा बंदी घालण्यात आलेल्या भाकप (मार्क्सवादी-लेनिनवादी) चा सरचिटणीस म्हणून 25 वर्ष काम करत होता. 1992 ते 2017 पर्यंत तो या पदावर होता आणि त्याच्या नक्षलवादी कारवायांमुळे त्याच्या डोक्यावर 1.5 कोटींचे इनाम ठेवण्यात आले आहे. प्रकृती ढासळत चालल्याने तो आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
राव हा खरोखर आत्मसमर्पण करणार आहे किंवा त्याच्या आत्मसमर्पणाची अफवा उठवून नक्षलवाद्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे याबाबत मात्र स्पष्टता नाही. आंध्र प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक नोएल स्वर्णजित सेन यांनी मात्र नक्षलवाद्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी अशी चर्चा होत असल्याची गोष्ट मानायला नकार दिला आहे. ठोस माहिती असल्याशिवाय अशा गोष्टी बाहेर येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मुप्पाला राव हा आत्मसमर्पण करण्याची शक्यता असल्याचे सांगतानाच सेन यांनी यापूर्वी अनेक कुख्यात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याची त्यांनी आठवण करून दिली. नक्षलवादी संघटनेने मात्र ही अफवा असल्याचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. मोदी सरकारने ही धडधडीत अफवा पसरवली असल्याचा त्यांनी दावा केला आहे. देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष भरकटावे यासाठी रचलेला हा कट असल्याचा आरोपही या नक्षलवादी संघटनेने केला आहे.
पेशाने शिक्षक असलेला मुप्पाला राव उर्फ गणपती हा 70 च्या दशकात नक्षलवादी चळवळीशी जोडला गेला होता. त्याच्याच प्रयत्नांमुळे पीपल्स वॉर ग्रुप आणि माओवादी केंद्र या तुकड्यांमध्ये हातमिळवणी झाली होती असं म्हणतात. नक्षलवादी गटाच्या केंद्रीय समितीमध्ये पूर्वी 39 सदस्य होते जे घटत जाऊन 15 झाले होते. यातल्या काही कुख्यात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, काहींचा मृत्यू झाला तर काहींना अटक करण्यात आली होती. यामुळे हा आकडा कमी झाला. मुप्पाला राव याचे वय आता 70 वर्षे असून त्याला अस्थमा, मधुमेह आणि वयोपरत्वे अनेक व्याधींनी ग्रासले आहे. त्याची जागा नंबाला केशव राव उर्फ बसवराजू याने घेतली आहे. मुप्पाला राव याची पूर्वीच्या काळी मुलाखत घेतलेल्या पत्रकारांनी म्हटलंय की त्याची प्रकृती ढासळलेली आहे ही गोष्ट खरी असली तरी तो आत्मसपर्पण करेल याबाबत काही माहिती नाहीये. राव याने आंतरराष्ट्रीय नक्षलवादी संघटनांशीही संधान बांधलेले होते. तो अत्यंत घातक होता असं माजी पोलीस अधिकारी नोएल सेन यांनी म्हटले आहे. द न्यूज मिनिट या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.



























































