
अहमदपूर तालुक्यातील सुमठाना येथील शेतकऱ्यांची गेल्या बारा वर्षांपूर्वी उर्ध्व मनार उपसा सिंचन प्रकल्पा अंतर्गत कालव्यासाठी (कॅनॉल) शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन केले. परंतु अद्याप त्या जमिनीचा मोबदला (मावेजा) शेतकऱ्यांना मिळाला नाही. तो देण्यात यावा यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी 8 सप्टेंबर रोजी उप-विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा 31 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे दिला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, उर्ध्व मनार उपसा सिंचन प्रकल्प योजना अंतर्गत डावा/उजव्या कालव्यासाठी (कॅनॉलमध्ये) सुमठाना येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भुसंपादन करून इ.स 2007-08 मध्ये खोदकाम केले गेले आहे परंतु आजतागायत आम्हाला कोणत्याही प्रकारचा मोबदला (मावेजा) मिळाला नाही. तरी संबंधित शेतकऱ्यांना मावेजा मिळवुन दयावा व शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस का दिली नाही, जमीन ताबा प्रमाणपत्र का दिले गेले नाही, याचा जाब विचारावा आणि संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर संबंधित शेतकऱ्यांच्या वतीने 8 सप्टेंबर रोजी अमरण उपोषण करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे निवेदन 31 ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी अहमदपूर यांना देण्यात आले आहे. सदरील निवेदनाच्या माहितीस्तव प्रति जिल्हाधिकारी लातूर, तहसीलदार अहमदपूर, पोलीस निरिक्षक अहमदपूर, व्हटी मध्यम प्रकल्प उपविभाग कार्यालय अहमदपूर यांना देण्यात आलेल्या आहे.
























































