
पापणी लवते न लवते तोच खिशातील मोबाईल हातोहात लंपास करणाऱ्या सातारच्या त्रिकुटाला पंढरपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केलीय. या टोळीकडून मोबाईल चोरीचे शेकडो गुन्हे उघड होण्यास मदत होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वास्तव्याला असलेल्या या चोरट्यांची नावे शाहिदा महादेव तुपे, भोजलिंग महादेव तुपे आणि कुर्डूवाडी येथील अहमद नजीर सय्यद अशी आहेत. हे तिघे अट्टल मोबाईल चोर आहेत. या चोरट्यांनी यापूर्वी सांगली जिल्ह्यात हैदोस घातला होता. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्याने या चोरट्यांनी आपला मोर्चा पंढरपूरकडे वळविला होता.
स्कॉर्पिओ, स्विफ्ट डिझायर सारख्या आलिशान गाड्यांमधून बाजार पेठेत घुसायचे आणि काही क्षणांत पाचपंचवीस मोबाईल चोरून हे त्रिकुट गायब व्हायचे. गेल्या काही महिन्यांपासून पंढरपूरच्या बजारपेठेतून शेकडो मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी पंढरपूर पोलीस ठाण्यात येत होत्या. पोलिसांनी विशेष पथके नेमुनही ही टोळी हाताला लागत नव्हती.
मात्र परवा सातारची ही टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. या तिघांना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्यांचे पंढरपूरमध्ये मोबाईल चोरीला गेले आहेत, त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केले आहे.


























































