लेख – ‘ज्ञानेश्वरी’तील सद्गुरू नमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नामदेव सदावर्ते

मराठी माणसाच्या हृदयरूपी पालखीमध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सन्मानाने विराजमान झाला आहे. अत्यंत श्रद्धापूर्वक त्याची पारायणे होतात. हा ग्रंथ मराठी सारस्वतांच्या साहित्यात तेजस्वीपणे प्रकाशत आहे. हा नवरसांचा सागर आहे. भावार्थाचे आगर आहे, सद्विचारी ज्ञानामृताची पवित्र नदी आहे. त्यातील ज्ञानराजांच्या वाक्चातुर्याचे मराठी मनाला आकर्षण आहे. ज्ञानेश्वरी वाचन आणि श्रवणाने मराठी मनाला कायम परमानंद होतो… आजच्या ज्ञानेश्वरी जयंती निमित्त…

ज्ञानेश्वरीत तत्त्वज्ञान, काव्य आणि अनुभव यांचा त्रिवेणी संगम आहे. संत ज्ञानराजांचे ते एक स्वयंसिद्ध ओवीबद्ध प्रवचन आहे. संत नामदेव महाराज ज्ञानदेवांच्या ‘ज्ञानदेवी’बद्दल म्हणतात-

‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ।।’

असा हा 730 वर्षांपूर्वी शके 1212 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे येथे श्रीमद्भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी अथवा ‘भावार्थदीपिका’ नावाचा मराठी भाषेत अप्रतिम ग्रंथ लिहिला.

लोपले ज्ञान जगी । हित नेणति कोणी ।।
अवतार पांडुरंग । नाव ठेविले ज्ञानी ।।
प्रकट गुह्य बोले । विश्व ब्रह्मचि केले ।।

कृष्णाष्टमीच्या दिवशी शके 1193 मध्ये पांडुरंग-श्रीकृष्णाने स्वतः ज्ञानराजांच्या रूपाने महाराष्ट्रात आळंदी येथे अवतार घेऊन ज्ञानेश्वरी-अमृतानुभवासारखे अलौकिक ग्रंथ लिहिले.

आपले ज्येष्ठ बंधू, आत्मज्ञान देणारे सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ यांच्या कृपादृष्टीचे, योगसामर्थ्याचे संत ज्ञानेश्वर महाराज कृतज्ञतापूर्वक वर्णन करतात. त्यांच्या अंतःकरणात सद्गुरूभक्ती ओतप्रोत भरलेली होती.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज हे प्रतिभासंपन्न कवी असल्याने त्यांनी सद्गुरूचे स्तवन करीत असताना सूर्य, गणपती, आई इत्यादी रूपकांचा उपयोग करून खूप रसभरीत व काव्यमय अशी वर्णने केली आहेत. सद्गुरूजवळ कृपाप्रसादाची मागणी ते सतत करतात.

ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात परमात्मरूपी ओंकाररूपी श्रीगणेशाचे काव्यमय वर्णन केल्यावर ज्ञानराज सरस्वतीवंदन करतात. नंतरच्या दोन ओव्यांत ते म्हणतात, ज्यांनी मला या संसारपुरातून तारिले ते सद्गुरू माझ्या हृदयात आहेत, म्हणून माझे विवेकावर प्रेम आहे.

मज हृदयी सद्गुरू। जेणें तारिलों हा संसारपुरू।
म्हणऊनि विशेंषे अत्यादरू। विवेकावरी।। ज्ञा. 1.22

भगवंताच्या बोलण्याचा अनुवाद करण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपले श्रीगुरू निवृत्तीनाथ यांना श्रीसंत ज्ञानदेव बहुतेक अध्यायांत नमन करतात. त्यातील काही नमने उच्च, गूढ अशा तत्त्वज्ञान व अध्यात्मज्ञान यांच्या चर्चेने भारलेली आहेत. मात्र नवव्या अध्यायाचे नमन अत्यंत रसपूर्ण, सोपे व आनंददायी आहे. यात लडिवाळपणाचा भाव अधिक आहे. भक्तिप्रधान अध्यायाच्या प्रतिपादनापूर्वी आपण लेकरू व सद्गुरू माय-बाप असे वर्णन करतात. लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसते आणि बापालाच जेवू घालावयास लागते, पण त्यामुळे बापाला राग येत नाही. उलट आनंदच होतो व त्या आनंदाच्या भरात तो आपण होऊन आपले तोंड पुढे करतो. त्याप्रमाणे ज्ञानदेव म्हणतात, ‘आपल्या अंतःकरणात माझ्याविषयी प्रेम असल्यामुळे तुम्हाला माझ्या बालबुद्धीचे कौतुक वाटते. तसेच गाईच्या सडाला वासराने ढुसणी दिली तर त्यायोगाने गाईला अधिक पान्हा फुटतो. आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होते. तसे मी बालबुद्धीने बडबडत आहे ते ऐकून तुम्ही आनंदीत होत आहात यातच आपले प्रेम दिसते.’

दहाव्या अध्यायाच्या नमनात श्रीज्ञानदेव आपल्या गुरूंना संस्कृतप्रचुर शब्दांनी नमन करतात. प्रथम निवृत्तीनाथांचे आध्यात्मिक स्वरूप, नंतर त्यांचे सामर्थ्य व अवर्णनीय महिमा सांगून गीतारूपी ठेवा आपणास प्राप्त झाला हे श्रीगुरूच्या कृपेचे फळ आहे असे सांगतात.

नमों विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
पराप्रमेय प्रमदा। विलासिया।।
नमो संसारतमसूर्या। अप्रतिम परमवीर्या।
तरुणतरतुर्या। लालन लिला।।
नमो सुभावभजन भाजना। भवेभकुंभभंजना।
विश्वोद्भवभुवना। श्रीगुरूराया।। ज्ञा. 10. 1/2/4

संत ज्ञानदेव हे जसे उत्कृष्ट कवी होते त्याचप्रमाणे ते शीलसंपन्न गुरुभक्तही होते. आपण कार्य करण्यास उद्युक्त झालो, पण श्रीगुरूंचा आशीर्वाद सदैव असावा म्हणून ते वेळोवेळी ‘कृपाभांडवल सोडी’ म्हणून श्रीगुरूंची प्रार्थना करतात.

तीरे संस्कृताचि गहनें। तोडोनि मराठिया शब्दसोपानें।
रचिली धर्मनिधानें। निवृत्ती देवें।। ज्ञा. 11.9

श्रीगुरूकृपादृष्टीला ज्ञानराज आईच्या प्रेमळ रूपकाने नमन करतात. आपण बाळ व श्रीगुरू आई आहेत. आईच्या मांडीवर खेळत या बालसाधकाची आध्यात्मिक समाधीपर्यंत प्रगती होते. आपल्या ग्रंथात नवरसांचा उत्कर्ष व्हावा, साहित्य अलंकार यांची रेलचेल असावी, नास्तिकपणा, वितंडवाद, कुतर्क यांचा विटाळही आपल्या सग्रंथाला होऊ नये. श्रीकृष्णाच्या गुणानुवादात आपण रमून जावे म्हणून श्रीगुरूंना ज्ञानेश्वर विनंती करतात.

अहो सद्गुरूचियें कृपादृष्टी। तुझे कारुण्य जयाते अधिष्ठा।।
तो सकळ विद्यांचियें सृष्टी। धात्रा होये।। ज्ञा. 12/9

श्रीगुरूंच्या केवळ स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होऊन वक्तृत्वाला नवरसांचा बहर येतो. त्याश्रीगुरूंना ज्ञानराज वंदन करतात.
आत्मरूप गणेशु स्मरण। सकळ विद्यांचे अधिकरण।

तेचिं वंदू श्रीचरण। श्रीगुरूंचे।। 13.1

श्रीगुरूचे वर्णन करण्यास वेदासही शक्य झाले नाही.
यालागीं आतां। स्तुति सांडुनि निवांता।
चरणीं ठेविजें माथा। हेचि भलें।। असे सांगून संत ज्ञानराज म्हणतात-

आता कृपाभांडवल सोडीं। भरीं मति माझी पोतडी।
करी ज्ञानपद्यजोडी। थोरा माते।। 14.17

म्हणजे कृपारूपी भांडवल सोडा व तिने माझी बुद्धीरूपी पिशवी भरा व ज्ञानकाव्य लाभाने मला समर्थ बनवा!
पंधराव्या अध्यायाच्या प्रारंभी श्रीगुरूचरणांचे ज्ञानदृष्टीने मानसिक पूजेचे उत्कट वर्णन करतात.

आतां हृदय हें आपुलें। चौफळुनिया भले।
वरी बैसवूं पाऊले। श्रीगुरूचीं।। 15.1

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

तेथ अहं हा धूप जाळूं। नाहं तेजे ओवाळूं।
सामरस्ये पोटाळूं। निरंतर।। 15.7

श्रीगुरूचरणांची मानसिक पूजा आध्यात्मिक रूपकाने वर्णन केल्यानंतर ज्ञानसूर्याचा उदय होतो. त्यानंतर भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान अनुभवयास येते असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. श्री ज्ञानदेवांनी सद्गुरूंना केलेल्या या नमनातून त्यांच्या भक्तिभावाचे दर्शन घडते.