
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातही तलावांत सध्या 14 लाख 17 हजार 931 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार करता आजच्या दिवशी सर्वाधिक जलसाठा जमा झाला आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी, विहार अशा सात तलावांतून दररोज 3800 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला वर्षभर पुरेसे पाणी पुरवण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी सातही तलावांत मिळून 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर पाणी जमा होणे आवश्यक असते. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर सातही तलाव कधी भरतात याकडे मुंबईचे लक्ष लागलेले असते. मात्र यावर्षी ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत केवळ 35 टक्केच पाणी जमा झाल्याने 5 ऑगस्टपासून मुंबईत 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. मात्र ऑगस्टमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे 19 ऑगस्टपासून 10 टक्के आणि 28 ऑगस्टपासून उर्वरित 10 टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली.
तीन वर्षांची 7 सप्टेंबरची स्थिती
वर्ष जलसाठा टक्केकारी
2018 1397681 96.57
2019 1415978 97.83
2020 1417931 97.97
7 सप्टेंबर रोजीचा जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
तलाव जलसाठा टक्केवारी
अप्पर वैतरणा 219815 96.81
मोडकसागर 128310 99.52
तानसा 144828 99.83
मध्य वैतरणा 187329 96.80
भातसा 701947 97.90
विहार 27698 100
तुळशी 8002 99.46
373 दिवसांना पुरणारे पाणी
सातही तलावांत मिळून सध्या 1417931 दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. मुंबईला दररोज होणारा 3800 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा पाहता हे पाणी पुढील 373 दिवसांना पुरणारे आहे. म्हणजेच सध्या तलावांत मुंबईला आवश्यक असणाऱया वर्षभराच्या जलसाठय़ापेक्षा आठ दिवसांचा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

























































