प्रणव मुखर्जी मोठय़ा मनाचे नेते! त्यांचा कार्याचा प्रभाव कायम राहील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सदैव राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या प्रणवदा यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून केलेले काम देशासाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव कायम राहील. प्रणवदा अजातशत्रू होतेच, शिवाय त्यांना राजकारणात राहूनही आपल्या समर्थनार्थ काम केलेल्यांची जाणीव होती. ते भाषणबाजीपेक्षा काम करणारे होते. त्यामुळे त्यांनी त्याकाळी सरकारला अनेकदा वाचवल्याने ते संकटमोचक ठरले होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडताना माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी युती असूनही एनडीएमधूनही युपीएच्या प्रणवदांच्या मागे आपली शक्ती उभी केली होती. त्यामुळेच त्यांना निवडणूक जिंकणे शक्य झाले होते. त्यावेळी प्रणवदा शरद पवार यांच्याबरोबर मातोश्रीवर आले होते. आमची तेव्हा पहिली भेट होती मात्र समोरच्याचा आब राखून बोलणे, ऐकून घेणे अशा गोष्टी त्यांच्या स्वभावात पाहायला मिळाल्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले

रात गयी बात गयी म्हणून विसरणारे ते नव्हते

राष्ट्रपती असताना मुंबईत आले तेव्हा मला खास  राजभवनाकर बोलावून महापालिका निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केले. ते म्हणाले, मला वाटले नव्हते मी राष्ट्रपती होईन, शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे मी राष्ट्रपती झालो. हे ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुला भेटत आहे असे त्यांनी सांगितले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. नाहीतर काहीजण सत्ता मिळाल्यावर ‘रात गयी बात गयी’, खुर्ची दिसल्यावर आधीचे विसरतात. कोण तुम्ही आणि कोण आम्ही असे ते खुर्ची मिळाल्यावर वागले नाहीत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

माजी  मुख्यमंत्री शिकाजीराव पाटील-निलंगेकर, सुधाकर परिचारक, हरिभाऊ जावळे, सदाशिवराव ठाकरे, रामकृष्ण पाटील, सितलदास हरचंदानी, सुनिल शिंदे, श्यामराव पाटील, अण्णासाहेब उढाण, सुरेश पाटील, रामरतन बापू राऊत, मधुकर कांबळे, श्रीमती चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्तावही मांडला. या शोकप्रस्तावाला विरोधी पक्षनेते देकेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री जयंत पाटील आदींनी पाठिंबा दर्शवत दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहिली.

महाराष्ट्राचे उपकार न विसरणारा नेता

यावेळी त्यांनी माजी आमदार अनिल भय्या राठोड यांनाही शोकप्रस्ताकादरम्यान श्रद्धांजली वाहिली. राजस्थानमधून आलेले अनिल राठोड हे महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्राचे झाले. महाराष्ट्राचे उपकार मानणारा हा नेता होता.  लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रस्त्यावर उतरुन काम केले. लोकांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. नगर जिल्हयातून 25 वर्षे आमदार म्हणून निवडून येत असले तरी सामान्य कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. अनिल भय्या यांच्या जाण्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री अनिल भय्या राठोड यांना आदरांजली वाहिली.