कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कवठे येमाई 19 सप्टेंबरपर्यंत बंद; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 19 सप्टेंबरपर्यंत गाव बंद ठेवण्याचा आदेश प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिला आहे. प्रशासक तथा विस्तार अधिकारी बी. आर. गायकवाड, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. गावात 12 जणांना कोरोनाची लागण झाली असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या बंदच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळून गावात पूर्ण बंद पाळण्यात येणार आहे. व्यापारी, दुकानदार, नागरिक यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना,आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे. या बंदबाबत नागरिकांना माहिती व्हावी आणि नागरिकांनी घरीच थांबावे, या उद्देशाने ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात माहिती देण्यात येत आहे. कवठे येमाई कोरोना प्रतिबंधित क्षेत्र असून गावात विनामास्क व दुचाकीवर डबलसीट बसणाऱ्यांवर शिरूरच्या भरारी पथकाने मागील 2 दिवसांत दंडात्मक कारवाई करीत 3,250 रुपयांचा दंड वसूल केला आहे. बंदच्या गावातील व्यापारी, दुकानदार, नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.