
>> डॉ. चंद्रमोहन हजारी
ऑनलाईन शिक्षण, मुलांची चीडचीड, त्यांना बाहेरच पडता येत नाही… खेळता येत नाही… सध्याच्या कोरोना काळात या साऱया गोष्टी जरा सकारात्मक दृष्टीने घेऊया मग बघा… मुलं हॅप्पी… पालकही हॅप्पी…!
खरं तर या लॉकडाऊनमध्ये लहान मुलांची मजा झालेली आहे. आई-बाबा घरी असल्यामुळे या मुलांकडे दुर्लक्ष होण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय आई घरात असल्यामुळे घरचं सात्विक जेवण मुलं जेवत आहेत त्यामुळे त्यांचे आरोग्य आणि वजन दोन्ही चांगले आहे, असे माझ्या पाहण्यात आले आहे. मुलांमध्ये आजारांचे प्रमाण कमी झालेले आहे. साधारण दोन वर्षांनंतरची जी मुलं आहेत त्यांना खेळणे, मजामस्ती असल्यामुळे काही समस्या नाहीत. पण त्यापुढच्या वयातील मुलांना प्रॉब्लेम होतोय. घरात त्यांच्याशी खेळायला कोणी नाही म्हणून त्यांची चिडचिड होतेय. त्यांना मित्र-मैत्रिणींची आठवण येतेय. विशेषकरून ज्यांना एकच अपत्य आहे अशा घरात ही समस्या जास्त दिसून येत आहे. मुलांचे हट्ट वाढले आहेत. पण ज्या घरात दोन अपत्य त्यांना एकटेपणाची अडचण येत नाही. सोबत खेळायला भावंड असल्यामुळे त्यांचा वेळ चांगला जातोय.
लहान मुलांचे भावविश्व हे मोठय़ांपेक्षा वेगळे असते. मुलांचे मनोविश्व वेगळे असते. त्यांना चांगलं-वाईट यातला फरक समजत नसतो. त्यामुळे कोरोनाचे भीती त्यांच्या मनाला नाही. कोरोना हा महारोग असला तरी त्याचा त्यांच्यावर काही परिणाम दिसत नाही. कारण त्यांना ते काय हे माहीतच नसल्यामुळे त्यांना त्याची भीती वाटत नाही. त्यामुळे नैराश्याची समस्या त्यांना येत नाही. पण अचानक अजिबात घराच्या बाहेर पडता येत नसल्याने, सोबत खेळायला मित्रमंडळी नसल्याने या मुलांची चिडचिड पाहायला मिळत आहे. शिवाय एका कुटुंबात कोणाला कोरोना झालेला असेल विशेषकरून जेव्हा आईला कोरोना होतो, ती मोठय़ा मुलांबरोबर राहू शकत नाही. दोन वर्षांवरील जी मुलं आहेत ती मुलं एकटी पडतात. त्यांना आई दोन दोन आठवडे दिसत नाही. त्या मुलांमध्येही चिडचिडेपणा वाढलेला दिसतोय. ती मुलं नीट खातपीत नाहीत. त्यामुळे मुलांची पालकांनी नीट काळजी घ्यायला हवी.
मुलांची काळजी कशी घ्याल…
- शक्यतो मुलांना घराबाहेर कुठेही घेऊन जाऊ नका.
- काम असेल तरच पालकांनी बाहेर पडा, घरात आल्यावर कपडे, हातपाय याची स्वच्छता करा.
- बाहेर गेल्यावर सोशल डिस्टंन्सिसग, मास्किंग आणि सॅनिटाइझ या गोष्टी कटाक्षाने पाळणे.
- मुलांना नियमित वाफ द्या, कारण हा विषाणू नाकातून प्रवेश करतो.
- रोगप्रतिकारशक्ती एका दिवसात येत नाही, ती येता येता येते. त्यांचा आहार सात्विक ठेवा.
- दोन फळं, योग्य आहार, त्यात प्रथिनं, कर्बादके, फॅट्स, व्हिटॅमिनयुक्त पदार्थ द्यावेत.
- त्यांची झोपण्याची आणि उठवण्याची वेळ सारखी ठेवावी.
- तसेच मुलांना शाळा नसल्यामुळे खेळण्याकडे कल जास्त वाढला आहे. अशा वेळी त्यांना दिवसातून दोन तास अभ्यासाला बसवावे.
- आनंदी राहण्याने, घरातले वातावरण हसते खेळते ठेवल्यानेही मुलांवर सकारात्मक परिणाम होतो.
- घरात सर्दी खोकला कोणाला झाला असेल तर त्यांनी इतरांपासून विलग राहायला हवे.
- घरात मुलांना ताप येत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- प्रत्येक वेळी ताप येणं म्हणजे कोरोना नाही, पण तो आहेच असे समजून वेळीच औषधोपचार करावेत.
- मुलांना सर्दी-खोकला होईल असे पदार्थ देऊ नयेत.


























































