
पाटण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कराड तसेच सातारा येथे कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह 35 बेडचे कोवीड रुग्णालय सज्ज झाले आहे. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आठ दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह 35 बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करण्यासाठी पुढाकार घेत तालुका प्रशासनातील यासंदर्भातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. कोरोना रुग्णांकरीता आवश्यक असणारे 35 बेड ऑक्सीजनसह रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. 2 नोडल वैद्यकीय अधिकारी, 2 वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील 7 वैद्यकीय अधिकारी, 10 अधिपरिचारीका, 2 औषनिर्माता, 4 लॅब टेक्निशिअन, 1 कक्षसेवक, 2 सफाई कामगार याप्रमाणे ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात कोवीड रुग्णालयाकरीता एकूण 31 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.































































