
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडबाबत कलम 188 नुसार 2 लाख 74 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 29 कोटी 37 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात 22 मार्च ते 2आक्टोंबरपर्यंत कलम 188 नुसार 2,73,604 गुन्हे नोंद झाले असून 39, 004 व्यक्तींना अटक करण्यात आली. तर 96,532 वाहने जप्त करण्यात आली. यातील विविध गुन्ह्यांसाठी 29 कोटी 37 लाख 76 हजार 782 रुपये दंड आकारण्यात आला.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काहीजण त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 369 घटना घडल्या. त्यात 898 व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,13,601 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 96,352 वाहने जप्त करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील 225 पोलीस व 25 अधिकारी अशा एकूण 250 पोलिस कर्मचारी/अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कोरोना रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांना सांगितले.



























































