
मराठा आरक्षणाची आजची लढाई न्यायप्रविष्ट आहे. सरकारविरोधातील आंदोलने सुरूच राहतील. मागे काय केलंय; चांगले, की वाईट यावर आता भाष्य करायचे नाही, पण पुढे काय करायचे? यातून आपल्यासाठी केस लढविणारे सरकारने दिलेले वकील, तसेच अॅटर्नी जनरल यांच्या समूहाला पूर्णपणे सहकार्य कसे देता येईल, हे बघितले पाहिजे. आपल्याला त्यांना मानसिक पाठबळ व सूचना द्यायच्या असल्याची भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. दरम्यान, मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व हा शब्दच माझ्याकडे नको, असे स्पष्ट करत 4 एप्रिलच्या मोर्चात आपल्याच लोकांनी आपल्यावर केलेल्या टीकेची खंतही संभाजीराजे यांनी बोलून दाखवली.
मराठा आरक्षणाबाबत पुढील न्यायालयीन दिशा यावर चर्चा करण्यासाठी कोल्हापुरात आयोजित न्यायिक परिषदेत ते बोलत होते. यावेळी अॅड. श्रीराम पिंगळे, अॅड. आशिष गायकवाड, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, अॅड. रणजित गावडे, जयेश कदम, दिलीप देसाई यांच्यासह सकल मराठा समाज आणि जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार संभाजीराजे म्हणाले, 1902 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रथम वंचितांनाच आरक्षण का दिले?, आज शंभर वर्षे होऊनही ते साध्य का होत नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे. मराठा समाजाने सामाजिक मागासत्व सिद्ध केले आहे. आता हातात सोन्याचे बिस्किट असताना आपण एसईबीसी का?, आर्थिक मागासची (इडब्ल्यूएस) अपेक्षा का करता? उद्या इडब्ल्यूएस मुळे आरक्षण नाकारले, तर जबाबदार कोण? त्यामुळे मराठा आरक्षण मिळवणे हीच भूमिका हवी. इडब्ल्यूएसचे समर्थन करणारे फटका बसणार नसल्याचे लिहून देतील का, असा सवालही त्यांनी केला. न्यायालयीन प्रक्रियेत समाजासाठी वेळ देणाऱया वकिलांनाही सामावून घेण्याची सूचना त्यांनी केली.



























































