IPL 2020 – आर. अश्विनने असा जळजळीत कटाक्ष टाकला, फिंचही टरकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएलचा सामना झाला. या स्पर्धेतील 13 व्या सामन्यात एक वाद निर्माण होणार होता, मात्र फिरकीपटू आर.अश्विनमुळे हा वाद झाला नाही. यापूर्वी अश्विनने मांकडिंग पद्धतीने फलंदाजाला बाद केल्यावरून आयपीएलच्या गेल्या मोसमास मोठा वाद झाला होता. सोमवारच्या सामन्यात अश्विनला अशाच पद्धतीने फलंदाजाला बाद करण्याची संधी होती, मात्र त्याने फलंदाजाला वॉर्निंग देऊन सोडून दिलं.

दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टींग याने मांकडींग पद्धतीने फलंदाजाला बाद करण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. अश्विनने मात्र आपला निर्णय योग्य होता, फलंदाज क्रीजमध्ये नसल्याने आपण त्याला बाद केले असा पवित्रा घेतला होता.

विराटने इतिहास रचला

हिंदुस्थानचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथसह अनेक गोलंदाजांनी अश्विनला पाठिंबा दिला होता. गोलंदाज चेंडू टाकत असताना जर फलंदाज क्रीज सोडून बाहेर जात असेल तर ते योग्य नाही असे श्रीनाथ याने स्पष्टपणे म्हटले होते. अश्विनने सोमवारच्या सामन्यात फिंचला बाद केले असते तर हा वाद पुन्हा उफाळून आला असता. अवघ्या काही सेकंदामध्ये अश्विनला हे कळाले ज्यामुळे त्याने फिंचला वॉर्निंग देऊन सोडून दिले.

राजस्थानसमोर मुंबईचे तगडे आव्हान, रोहित शर्माच्या ब्रिगेडला हवाय चौथा विजय

अश्विनने सोमवारच्या सामन्यानंतर रिकी पॉन्टींगला टॅग करत एक ट्विट केलं आहे. यात त्याने त्याला शालजोडीतले हाणले आहेत. अश्विनने ट्विटमध्ये म्हटलंय की ‘आत्ताच सांगून ठेवतोय, 2020 साठीची ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. आत्ताच हे अधिकृततरित्या सांगतोय, नंतर मला दोष देऊ नका. रिकी पॉन्टींग मी आणि फिंच चांगले मित्र आहोत ही गोष्ट वेगळी’

अश्विनने फिंचला मांकडींग पद्धतीने बाद न केल्याने पॉन्टींग मात्र भलताच खूश आहे. अश्विनच्या या निर्णयानंतर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता.

गेल्या वर्षी झाला होता मोठा वाद
अश्विनने राजस्थान रॉयल्सविरूद्ध खेळत असताना जोस बटलर याला गोलंदाजी करत असताना क्रीजबाहेर गेल्याने मांकडींग पद्धतीने बाद केले होतं. अशा पद्धतीने बाद होणारा बटलर हा आयपीएलमधला पहिला फलंदाज होता. अश्विनने तत्याला बाद करण्यापूर्वी त्याला तू बाद होशील असा इशारा दिला नव्हता, यावरून वाद झाला होता. बाद झाल्यानं बटलर आणि अश्विनमध्ये मोठा वादही झाला होता.

मांकडींग म्हणजे काय?
गोलंदाजाच्या बाजूला उभा असलेला फलंदाज (नॉन स्ट्रायकर) हा चेंडू टाकला जात असताना क्रीजच्या बाहेर असेल तर त्याला गोलंदाज यष्टी उडवून बाद करू शकतो. या पद्धतीला मांकडींग म्हणतात. हिंदुस्थानचे माजी गोलंदाज विनू मांकड यांच्यामुळे फलंदाजाला बाद करण्याची ही पद्धत पुढे आली. त्यामुळे फलंदाजाला बाद करण्याच्या या पद्धतीला त्यांचेच नाव देण्यात आले. हा क्रिकेटमधला एक नियम आहे, मात्र अशा पद्धतीने बाद केल्यास ते खेळ भावनेच्या विपरीत वर्तन असते असे काही क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे. मांकड यांनी 1947 साली ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊन यांना पहिल्यांदा अशा पद्धतीने बाद केले होते. 1992-93 साली कपिल देव यांनी दक्षिणा आफ्रिकेच्या पीटर कर्स्टन यांनाही अशाच पद्धतीने बाद केले होते.

तुम्ही आता दै.सामनाच्या बातम्या टेलेग्रामवरही मिळवू शकता आमच्या Telegram चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – https://t.me/saamanaonlinenews