
पावसाचा जोर कमी होताचा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. खेड तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या 44 किलोमिटर रस्त्याचे काम मे 2020 अखेर पुर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनी दिवस-रात्र चौपदरीकरणाचे काम करत आहे.
लॉकडाऊन आणि त्यानंतर सुरु झालेला पाऊस यामुळे कामाला ब्रेक लागला होता. मात्र आतान पुन्हा एकदा चौपदरीकरणाच्या कामाला गती आली आहे. वेरळ खोपी-फाटा येथील रेल्वे ट्रकवरील पुल बांधणीच्या कामालाही युद्धपातळीवर सुरवात झाली आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या कशेडी ते पशुराम घाट या दरम्यानच्या 44 किलोमिटरच्या कामाचा ठेका कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने घेतला आहे. सद्यस्थितीत सुमारे 30 किलोमिटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाले असून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पुल किंवा मोया बांधणे आवश्यक आहे त्या ठिकाणचे काम थांबले होते मात्र आता पुल आणि मोऱ्या बांधण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीसमोर आव्हान होते ते 4 किलोमिटरच्या भोस्ते घाटाचे. अवघड वळणाचा हा घाट चढताना किंवा उतरताना चालकांचा कस लागत असे. वाहने हाकताना थोडा जरी हलगर्जीपणा झाला तर जिवावर बेतणारे होते.
पावसाळ्यात तर हा घाट अधिकच धोकादायक होत असे. मात्र आता या घाटातील भिती संपली आहे. पुर्ण घाट मार्ग वाहतुकीस खुला झाला असल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.
महामार्गावरील गजबजलेल्या भरणे नाका येथे महामार्गाचे काम गेली दोन वर्षे रखडले होते. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत होता. व्यवसायिकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला होता. मात्र भरणे नाका परिसरातील कामाला आता वेग आला आहे. येत्या काही महिन्यात भरणे नाका परिसरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे.

























































