
यूएईच्या धरतीवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा सुरू आहे. पहिल्या काही दिवसात झालेल्या लढतीत के.एल. राहुल, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या विकेटकिपर फलंदाजांनी आपल्या बॅटचा तडाखा विरोधी संघाला दिला आहे. तिघेही खेळाडू फॉर्मात असल्याने आगामी काळात एम.एस. धोनीची जागा कोण घेईल अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. याबाबत टीम इंडियाचे माजी खेळाडू संजय बांगर आणि आशिष नेहरा यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
एम.एस. धोनीची जागा घेण्यास ऋषभ पंत चांगला पर्याय आहे. कारण पंत डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि यामुळे मधल्या फळी टीमला संतुलन प्राप्त होईल, असे संजय बांगर म्हणाले. तसेच फलंदाजीसह यष्टीरक्षणही तो चांगला करत असून आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतीत त्याने दमदार खेळ केला आहे. टीम इंडियाकडे एका चांगल्या डावखुऱ्या फलंदाजाचा पर्याय असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
संजय बांगर यांच्या या विधानाला माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यानेही समर्थन दिले आहे. टीम इंडियाने ऋषभ पंत याच्यावर डाव खेळायला हवा, असे आपल्याला वाटत असल्याचे तो म्हणाला. तसेच पंतला पाठिंबा मिळायला हवा, किंबहुना जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सवाल येतो तेव्हा प्रत्येक खेळाडूला पाठिंबा मिळणे आवश्यक असतो, असेही नेहरा म्हणाला.



























































