
लॉकडाऊनमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले सिनेमागृहे येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. फक्त 50 टक्के प्रेक्षक क्षमता तसेच दोन प्रेक्षकांमध्ये एक सीट रिकामी सोडून सिनेमागृहे सुरू होतील. याबाबतची नियमावली केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने आज जारी केली. अर्थात राज्यांमध्ये थिएटर्स कधी सुरू करायची याचा निर्णय सर्वस्वी त्या त्या सरकारांवर सोडण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र तरी सध्या थिएटर्संना सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार मल्टीप्लेक्स सुरू होणार आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे. 50 टक्के क्षमतेने सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
चित्रपटापूर्वी कोरोनासंदर्भात जनजागृती करणारी एका मिनिटाची शॉर्ट फिल्म अथवा एक घोषणा करणे अनिवार्य आहे. तसेच ऑनलाइन तिकीट आरक्षित करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये तिकीट काऊंटर सुरू राहतील. वेंटिलेशन व्यवस्था, सिनेमा हॉलचे तापमान 23 डिग्रीपेक्षा जास्त असावे, आदी सूचना असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
आत गेल्यावर काय
- फक्त पॅक केलेले फूड आणि पेयं घेण्यास परवानगी. त्यासाठी जास्तीचे काऊंटर सुरू करावेत.
- हॉलमध्ये फूड डिलिव्हरीला परवानगी नाही
- प्रेक्षकांनी रांगेने आत- बाहेर जावे, गर्दी टाळावी. त्यासाठी मध्यंतराचा वेळ वाढवता येऊ शकेल.
- प्रत्येक शोच्या वेळा वेगवेगळ्या असतील. एक शो संपून आणि दुसरा सुरू होण्याची वेळ एकच ठेवता येणार नाही.
- शो संपल्यावर प्रेक्षकांना रांगेने बाहेर काढावे, जेणेकरून फिजिकल डिस्टन्सिंग राहील.
- एक शो संपल्यावर पूर्ण हॉल सॅनिटाईज होईल. त्यानंतर दुसऱ्या शोचे प्रेक्षक आत बसतील.
अन्य व्यवस्था कोणत्या
- सिनेमा सुरू होण्याआधी, मध्यांतरावेळी आणि सिनेमां संपल्यावर कोरोना जनजागृतीची एक मिनिटाची फिल्म दाखवणे बंधनकारक.
- हॉलच्या बाहेर सहा फूटाच्या अंतरावर जमिनीवर मार्पिंग करावे लागेल. सोशल डिस्टन्सिंगसाठी बॉक्स ऑफिसमध्ये जागोजागी माकिंग केले जावे.
- क्रॉस वेंटिलेशन आणि हॉलमधील एसीचे तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस असावे
- सिंगल स्क्रीन सिनेमागृहांमध्ये तिकीट बुकिंगसाठी जास्त काऊंटर उघडावी लागतील.
- ऑनलाइन तिकीट बुपिंगला प्रोत्साहन द्यावे. पेमेंट करताना डिजिटल पद्धतींना प्रोत्साहन द्यावे.
- तिकीट विक्री पूर्ण दिवस सुरू असावी, गर्दी टाळण्यासाठी आगाऊ तिकिट बुकिंगची सेवा द्यावी
- आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचा सल्ला.
सिनेमागृहांमध्ये प्रवेश…
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी संपर्क नंबर देणे आवश्यक
- मास्क लावणे
- थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक
- केवळ लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दिला जाईल.
बसण्याची व्यवस्था… - सिनेमागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक प्रेक्षकांना परवानगी नसावी.
- एक सीट सोडून बुकिंग करण्यात येईल. ‘येथे बसू नये’ असे सीट्सवर माकिंग करणे आवश्यक.
- एकामागे एक व्यक्ती बसता कामा नये. म्हणजेच जी सीट रिकामी असेल, तिच्या मागच्या सीटचे बुकिंग होईल.

























































