
आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबद्दल माहिती सांगणार आहोत, जेथे 5 टॉमेटोची किंमत 5 लाख इतकी आहे. हा देश आहे ‘व्हेनेझुएला’. दक्षिण अमेरिका खंडातील एक चिमुकला पण खनिज तेलसमृद्ध देश. अमेरिकाप्रणीत भांडवलशाहीविरोधात उभा दावा मांडणाऱ्या दिवंगत माजी अध्यक्ष ह्य़ुगो चॅवेझ यांचा देश. व्हेनेझुएला एकेकाळी खूप श्रीमंत देश होता, परंतु आज या देशाच्या चलनाचे मूल्य रद्दीसारखेच राहिले आहे. महागाईचा दर इतका उच्च आहे की लोक एक कप चहा किंवा कॉफीसाठी पिशव्या भरून नोट घेऊन जातात. आता या समस्येवर मात करण्यासाठी व्हेनेझुएला सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, व्हेनेझुएलाची केंद्रीय बँक आता एक लाख बोलिव्हरची (व्हेनेझुएलाचे चलन) नोट जारी करणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात मूल्य असलेली नोट असणार आहे. यासाठी व्हेनेझुएला बँक नोट कागद बाहेरच्या देशातून खरेदी करत आहे. मात्र असे असेल तरी, एक लाख बोलिव्हरची किंमत केवळ 0.23 डॉलर इतकी असेल. म्हणजेच याने फक्त दोन किलो बटाटे खरेदी केले जाऊ शकतील. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृतानुसार, येथील महागाई दर हा 929789.5% टक्के इतका आहे. येथे एक अमेरिकन डॉलर सुमारे 41,101 बोलिव्हर समतुल्य आहे. तर हिंदुस्थानचा एक रुपया येथे जवळपास 576 बोलिव्हर समतुल्य आहे.




























































