कोरोनामुळे नपुंसकत्व येण्याची शक्यता; संशोधनातील निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-test-11

कोरोनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना मानसीक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या संशोधनातून कोरोनाबाबत धक्कादायक निष्कर्ष उघड झाले आहेत. कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या पुरुषांना नपुंसकत्व येण्याचा धोका असतो, असे या संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. इस्त्रायलमधील डॉक्टरांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

इस्त्रायलमधील शेबा मेडिकल सेंटरचे डॉ. डॅन अॅडेरका यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे संशोधन केले आहे. कोरोनाबाधित पुरुषांची तपासणी करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. कोरोनाबाधित झालेल्या काही पुरुषांमधील शुक्राणू कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. शुक्राणूवरच कोरोनाने हल्ला चढवल्याने वीर्यातील शुक्राणूंचे प्रमाण घटल्याने अशा पुरुषांमध्ये नपुंसकत्वाची समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. कोरोनाबाधित पुरुषांमध्ये शुक्राणूंचे प्रमाण निम्मापेक्षा जास्त घटल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

कोरोनाबाधित पुरुषांमध्ये वीर्याचे प्रमाण कमी होत असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे. तसेच कोरोना व्हायरस टेस्टिकलमधील दोन महत्वाच्या पेशींवरही हल्ला करत असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे. कोरोनामुळे होणारा हा परिणाम दीर्घकाळ शरीरावर राहतो. मात्र, नेमके कधीपर्यंत याचे परिणाम दिसतात आणि शुक्राणूंमध्ये वाढ होते की कायमस्वरूपी नपुंसकत्व राहते, याबाबत अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे डॉ. डॅन यांनी सांगितले. याआधीही झालेल्या संशोधनातून कोरोनामुळे पुरुषांना नपुंसकत्व येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता इस्त्रालयलमधील शेबा मेडिकल सेंटरच्या संशोधनातूनही असेच निष्कर्ष आले आहेत. डॉ. डॅन आणि त्यांचे पथक कोरोनाबाधितांची सहा महिन्यांनी आणि वर्षभरानंतर पुन्हा तपासणी करणार आहेत. त्यावेळी त्यांच्या शरीरात काय बदल होतात. याचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यावरून किती काळपर्यंत शरीरावर कोरोनाचा प्रभाव राहतो, हे समजण्यास मदत होणार आहे.