
चीन आणि पाकिस्तान अशा दोन आघाड्यांवर एकाचवेळी लढण्यासाठी हिंदुस्थान सज्ज आहे असे विधान लष्कर प्रमुखांची केले. या विधानाला बळ दिले आहे ते डीआरडीओ या संस्थेने. डीआरडीओ पुढील आठवड्यात 800 किलोमीटरवर अचूक निशाणा साधणाऱ्या निर्भय सब-सोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे. लष्करात आणि नौदलाच्या ताफ्यात याचा समावेश करण्यापूर्वी औपचारिक स्वरूपात ही चाचणी घेण्यात येणार आहे.
लडाख सीमेवर चीनशी सुरू असलेला वाद अद्याप पूर्णतः शमलेला नाही. तसेच पाकिस्तानही याचा फायदा उठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वरक्षणासाठी युद्धसज्ज राहणे हिताचे आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात डीआरडीओने 9 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. आता दहाव्या चाचणीची तयारी सुरू आहे.
डीआरडीओने 7 सप्टेंबरला हायपरसोनिक तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतली. त्यानंतर 22 सप्टेंबरला एमपीएटीजीएम’ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. अडीच किलोमीटरपर्यंत असलेल्या कोणत्याही रणगाड्याला नष्ट करण्याची याची क्षमता आहे. 23 सप्टेंबरला पृथ्वी क्षेपणास्त्र, 30 सप्टेंबरला ब्राह्मोस क्षेपणास्त्र, 3 ऑक्टोबरला शौर्य क्षेपणास्त्र, 5 ऑक्टोबरला स्मार्ट सिस्टीम (पाण्याखालून प्रवास करणाऱ्या पाणबुडीला 600 किलोमीटर लक्ष्य करण्याची क्षमता) आणि दोन दिवसांपूर्वी रुद्रम क्षेपणास्त्राची सुखोई विमानातून यशस्वी चाचणी घेत चीन-पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा दिला.

























































