
हिंदुस्थानसह जगभरातील सिनेप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी रविवारी आपला 78 वा वाढदिवस साजरा केला. अगदी सर्वसामान्यांपासून बॉलीवूड, राजकीय, क्रीडा क्षेत्रांतील सेलिब्रेटींनी त्यांच्यावर सोशल मिडियातून शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पाडला. ‘तुमचे प्रेम हीच माझ्यासाठी मोठी भेट आहे’, असे म्हणत बिग बी यांनी सोशल मिडियावरून चाहत्यांचे आभार मानले आहेत.
11 ऑक्टोबर म्हणजे बिग बी यांच्या चाहत्यांसाठी आनंदोत्सवच असतो. यंदा कोरोनाच्या महामारीमुळे वाढदिवसाचे सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. दरम्यान, जगभरातील चाहत्यांनी केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावाबद्दल हात जोडलेला फोटो सोशल मिडियावरून शेयर करत बिग बी यांनी चाहत्यांचे आभार मानले आहे. या फोटोत वेगवेगळ्या भाषामंध्ये ‘धन्यवाद’ लिहिलेले दिसत आहे. सोबत केलेल्या पोस्टमध्ये बिग बी म्हणाले, ‘तुमचे औदार्य आणि प्रेम हीच माझ्यासाठी 11 ऑक्टोबरची सर्वात मोठी भेट आहे. याहून अधिक मी काही मागू शकत नाही.’
बिग बी यांच्या आगामी प्रोजेक्टबाबत बोलायचे झाले तर, सध्या ते ‘केबीसी’च्या 12 व्या सीजनमध्ये व्यस्त आहेत. याशिवाय आगामी काळात ‘झुंड’, ‘चेहरे’ आणि ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमात झळकणार आहेत. नुकतीच त्यांची दीपिका आणि प्रभासच्या आगामी चित्रपटात एंट्री झाली आहे.


























































