वेश्या व्यवसायातील महिला निवडतायत वेगळी वाट, कोरोनामुळे आर्थिक फटका बसल्याने उदरनिर्वाहासाठी उद्योगधंद्यांकडे कल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या महामारीचा फटका वेश्या व्यवसायाला देखील बसला आहे. परिणामी उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसलेल्या, कर्जात बुडालेल्या वेश्याव्यवसायातील महिला आता प्रतिष्ठत जीवन जगण्यासाठी इतर पर्यायांचा शोध घेताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अशा महिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘आधार’ सारख्या स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत.

वेश्याव्यवसाय करणाऱया हसीना (बदललेले नाव) यांना कपडय़ांचा व्यवसाय सुरू करायचा आहे. हसीना म्हणाल्या, ’मला या वेश्या व्यवसायातून मुक्त व्हायचे आहे. या महामारीआधी मी पार्ट-टाइम कापड विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र या साथीच्या आजारामुळे सर्व काही बदलले. वेश्याव्यवसायाची मागणी कमी झाल्यामुळे पैसे मिळत नव्हते. आता मला स्वतःचा कापड व्यवसाय सुरू करायचा आहे.  तर याच भागात वेश्याव्यवसाय करणाऱया रोझी (बदललेले नाव) म्हणाल्या, ’मला बांधकाम क्षेत्राबद्दलची माहिती असल्यामुळे इमारतींच्या बांधकामात वापरल्या जाणाऱया किरकोळ प्लेट्स तयार करण्यासाठी मी उत्सुक आहेत. हा पुरुषप्रधान उद्योग आहे, मात्र मला यात नाव मोठे करायचे आहे.’

जळगावातील आधार ही संस्था दुर्लक्षितांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे. ही संस्था या उपक्रमाला पाठिंबा देत असून वेश्याव्यवसाय करणाऱया महिलांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यासोबत त्यांना बिझनेस मॉडेलसाठीही मदत करत आहे.

कोरोनाच्या काळात वेश्या व्यवसाय धोकादायक आहे आणि स्त्रिया उपचारही घेऊ शकत नाहीत. या महिला आता मोठय़ा कर्जात अडकल्या आहेत. अमळनेर येथे ही परिस्थिती अत्यंत भीषण आहे. आम्हाला या महिलांना उपजीविकेचे पर्यायी मार्ग शोधण्यास मदत करायची आहे. वेश्या व्यवसायिकांना आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. – भारती पाटील, संस्थापक, आधार