जालन्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने खरीप पीकाचे प्रचंड नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सततच्या दुष्काळी परिस्थितीनंतर या वर्षी जून महिन्यापासून कोसळलेल्या पावसामुळे बदनापूर तालुक्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना हक्काने उत्पादन मिळवून देणारे मूग, उडीद पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असतानाच आता मका, बाजरी व सोयाबिन सोंगणी करून ठेवलेले असताना आलेल्या परतीच्या पावसाने तेही हातातून जाणार असल्याचे चित्र आहे तर नगदी पिक म्हणून ओळखले जाणारे कापूसही पिकालाही प्रचंड फटका बसला असून कापूस बोंडातून निघून आल्यानंतर ओला होऊन गळून पडत असून कित्येक ठिकाणी कापूस बोंडे सडून लालसर झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे दसरा दिवाळी कशी साजरी करावी ही चिंता आहे. बदनापूर तालुक्यात यंदा सुरुवातीपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यातच गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या परतीच्या पावसाने तालुक्यात पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत असून प्रशासनाने पंचनामे केल्यानंतरही शेतकरी मात्र मदतीच्या प्रतिक्षेत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसून व जमीन खरडून खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले. यात तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांना प्रामुख्याने मोठा तडाखा बसला. ऐन दसरा- दिवाळीच्या दिवसांत शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षीच्या एकूण हंगामापैकी एकंदरीत 90 टक्के खरीप हंगामाचं पावसामुळे नुकसान झालं आहे. याशिवाय परतीचा पाऊस लांबत असल्यानं रब्बीच्या पेरण्यासुद्धा लांबणीवर पडल्या आहेत. त्याचा परिणाम बाजार पेठेवर सुद्धा जाणवत आहे.

अनेक ठिकाणी कापलेलं सोयाबीन मातीमोल ठरलं आहे, सोयाबीनच्या सुड्या उभ्या आहेत. त्यातील काही काळ्या पडल्या. तर कित्येक ठिकाणी उभ्या बाजरीच्या कणासाला कोंब आले असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. दसऱ्यापूर्वी मका, सोयाबिन व बाजरीची विक्री करून रब्बी पिकांची पेरणी खर्च व दिवाळी दसरा साजरा करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो पण यंदा खरीप हंगामातील पिकांमधून उत्पादन निघण्याची शक्यता नसून नगदी पिक म्हणून ओळखले जाणारे कापूस पिकांवरही या पाऊसामुळे परिणाम झालेले असून उभ्या पिकावरील कापूस ओला होत आहेत तर अतिपावसामुळे काही शेतीतील बोंडच सडले असल्यामुळे उत्पादन शून्य होणार आहे तर काही ठिकाणी कापूस लालसर होत असल्याचे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सण कसे साजरे करावे ही विवंचना आहे.