
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक सभांमध्ये तुतारीच्या गगनभेदी गजराने आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या हरिओम तुतारीवाले अर्थात हरीदास गुरव यांच्या मदतीला शिवसेना धावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी गुरव यांच्या राहत्या घराचे भाडे आणि लाइट बिल भरण्यासाठी आर्थिक सहकार्य केले. शिवाय पुढील उपचारासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. शिवसेनेच्या या मदतीमुळे गुरव कुटुंबीयांनी शिवसेनेचे आभार मानले.
सध्या घाटकोपर येथे राहणारे हरीदास गुरव यांनी शिवसेनेच्या सभांसह अनेक सभा, कार्यक्रमात तुतारी वाजवून नागरिकांची मने जिंकली आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे हरिदास गुरव हे आर्थिक संकटात सापडले होते. शिवाय किडनीच्या आजारामुळे त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागत होता. गेल्या सहा-सात महिन्यांपासून कोणताही कार्यक्रम नसल्याने हरीदास यांच्या घराचे भाडे थकले होते. आजारपणाचा खर्च करणे त्यांना मुश्किल बनले होते. त्यामुळे एका कलाकारावर इतरांकडे मदत मागण्याची वेळ आली होती. या बाबत सोशल मीडियावर माहितीही प्रसारित होत होती. याची दखल शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी तातडीने घेतली. सकपाळ यांनी हरीदास यांना आपल्या कार्यालयात बोलावलं. सकपाळ यांनी त्यांची व पत्नीची आस्थेने विचारपूस करून थकलेल्या घरभाड्याचा आणि वीजबिलाचा चेक तातडीने दिला. शिवाय, किडनीच्या उपचारासाठी जेजेमधल्या डॉक्टरांना सूचनाही केली आहे. याबाबत बोलताना पांडुरंग सकपाळ म्हणाले की, ‘तुतारीवाल्याची बातमी वाचनात आल्यानंतर शक्य ती मदत करण्याचे ठरवले. हरीदास यांच्याकडे थकलेले घरभाडे आणि वीज बिलाचा चेक सुपूर्द केला. आगामी काळात त्यांना आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. आता हरीदास यांनी आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला आहे!’


























































