
पंढरपूरलाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गेल्या 24 तासात 141 मिमी पाऊस झाल्याने पंढरपूर शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. उजनी धरणातून अडीच लाख क्यूसेक्स पाणी सोडण्यात आल्याने चंद्रभागा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी पात्रातील मंदिरे पाण्याखाली बुडाली असून तीरावरील वस्तीत पाणी शिरल्याने 800 कुटूंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
उजनीचा विसर्ग गुरुवारी दीड लाखाने कमी केला असला तरी यापूर्वी सोडलेले पाणी शहराच्या घोंगडे गल्ली, संतपेठ आदी भागात शिरत आहे. मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडलेले पाणी यामुळे पंढरपूर शहरातील आणि नदीकाठच्या गावांमध्ये भितीचे वाावरण आहे. प्रशासकीय यंत्रणा पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जोमाने काम करत आहेत. पावसाच्या पाण्याने शेतातील उभे पिके अनेक ठिकाणी वाहून गेली आहेत. पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. पंढरपूरच्या बाजारपेठेतील तळमजले पाण्याने भरुन गेल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. एकाच दिवसात हंगामातील पाऊस पडल्याने सर्वत्र पाणी साचले आहे. गुरुवारी उजनीतील विसर्ग एक लाख केल्याने पंढरपूरातील पूर हळूहळू ओसरायला सुरुवात होणार आहे. पंढरपूरकडे येणाऱ्या प्रमूख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. तसेच पावसाने काही काळ उघडीप दिली होती.

























































