
कॅनेरा बँकेच्या एटीएम मशीनमध्ये तांत्रिक छेडछाड करुन तब्बल 8 लाख रुपये चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटना धनकवडी आणि सदाशिव पेठेतील एटीएम सेंटरमध्ये घडल्या आहेत. याप्रकरणी ऋषीराज भोसले (वय 34, रा. हडपसर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीत कॅनेरा बँकेचे एटीएम सेंटर आहे. 26 ते 30 सप्टेंबर या कालावधीत चोरट्यांनी मशीनचे हूक काढून इंटरनेट केबल बंद केले. त्यानंतर रिसेटचे बटन दाबून ट्रान्जेक्शन करीत तांत्रिक छेडछाड केली. त्यानंतर 5 लाख 66 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी सदाशिव पेठेतील कॅनेरा बँकेच्या एटीएम मशीनची तांत्रिक छेडछाड करुन 2 लाख 46 हजार रुपये काढून नेले. याप्रकरणी आषुतोश उपाध्याय (वय 33, वल्लभनगर,पिंपरी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ते 12 ऑक्टोबरदरम्यान दोन चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करुन मशीनचे हुड काढले. त्यानंतर मशीनमध्ये तांत्रिक छेडछाड करुन 2 लाख 46 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. संबंधित बँक प्रशासनाला सुरक्षिततेसंदर्भात खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी सांगितले.






























































