मास्कशिवाय फिरू नका, कारवाईसाठी 600 क्लीन अप मार्शलही तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून आता मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी तब्बल 600 क्लीन अप मार्शल तैनात ठेवण्यात आले आहे. हे क्लीन अप मार्शल रस्त्यावर थुंकणाऱ्यांवरही कारवाई करणार असून 200 रुपयांचा दंड वसूल करणार आहेत. त्यामुळे मास्कशिवाय फिरू नका, रस्त्यावर थुंकू नका असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे अनिवार्य आहे. याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सध्या मास्क न घालता फिरणाऱ्यांना 200 रुपयांचा दंड करण्यात येत आहे. आगामी काळात हा दंड 400 रुपये करण्याचा पालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये आता या कारवाईचे प्रमाण वाढवण्यासाठी आता खास कोरोनाच्या लढय़ासाठी कंत्राटदाराच्या माध्यमातून क्लीन अप मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 30 ते 35 क्लीन अप मार्शल बसस्टॉप, स्टेशन, मार्केट आदी सार्वजनिक ठिकाणी ड्रेसकोडमध्ये तैनात राहणार आहेत. मास्कशिवाय आढळल्यास 200 रुपयांचा दंड केला जाणार असून पावतीही दिली जात आहे.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य आहे. त्यामुळे परिणामकारक अंमलबजावणीसाठी पालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांसोबत क्लीन अप मार्शलही कारवाई करीत आहेत. पालिकेच्या सर्व 24 विभागांत क्लीन अप मार्शल तैनात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावे.
– अशोक यमगर, मुख्य अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन