
राज्यभरातील व्यायामशाळा, जिम, फिटनेस सेंटर्स कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने शिथिल करतानाच दसऱयापासून राज्यभरातील व्यायामशाळा, जिम, फिटनेस सेंटर्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार मात्र बंदच राहणार आहेत. जिम, व्यायामशाळांत कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची काळजी घ्या, नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या आरोग्यासाठी व्यायामाला परवानगी देतानाच नियमावलीचे पालन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश पालन करण्याची ग्वाही या प्रतिनिधींनी दिले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जिम, व्यायामशाळा या आरोग्यासाठीच आहेत. पण त्यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. मोठय़ा शहरांबरोबच राज्यातील ग्रामीण भागातही जिम, व्यायामशाळा यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ‘एसओपी’चे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे.
या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषपुमार सिंह, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी तसेच महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे निखिल राजपुरीया, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य, करण तलरेजा, अभिमन्यू साबळे, महेश गायकवाड, हेमंत दुधवडकर, साईनाथ दुर्गे, राजेश देसाई, योगिनी पाटील आदी उपस्थित होते.
गलथानपणा आढळल्यास कठोर कारवाई
हा व्यवसाय आहे, पण तसा तो जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. आता रुग्ण संख्या कमी होते आहे. पण युरोप खंडातील उदाहरणांवरून आपल्याला सावधही रहावे लागेल. निर्बंध शिथिल करताना हळूहळू गाफीलपणा वाढू नये यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष झाल्यास, कोरोनाशी लढण्यासाठी ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्यावर ताण येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यामुळे या ‘एसओपी’चे पालन करण्याची जबाबदारी जिम, व्यायामशाळा यांच्या मालकांवर आहे. या ‘एसओपी’चे काटेकोर पालन न केल्यास, गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, अशी समजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
– झुम्बा, स्टिम, सौना बाथ बंद राहणार
– गलथानपणा आढळल्यास कठोर कारवाई
अशी असेल नियमावली
– व्यायामशाळेत येणाऱयांना ‘एसओपी’ची माहिती द्यावी. मर्यादित संख्येतच प्रवेश द्यावा.
– प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी करावी.
– शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरण्याबरोबरच क्षेत्रफळांनुसार सुरक्षित शारीरिक अंतर राखणे आवश्यक.
– दर तासाला निर्जंतुकीकरण करून, रात्री जिम,व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावे. उपकरणांमध्ये अंतर ठेवून त्यांचे निर्जंतुकीकरण.

























































