शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज धाराशीवमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाड्यातील शेतशिवार उद्ध्वस्त झाले आहे. या राक्षसी पावसाने मराठवाडय़ातील जवळपास 35 लाख हेक्टरवरील खरिप पिके नेस्तनाबूत झाली आहेत. सोयाबीन, कापसासह खरीप पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी अक्षरशः रस्त्यावर आला आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी धाराशिव जिह्याच्या दौऱयावर येत आहेत. काटगाव व अपसिंगा येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

कायम दुष्काळाशी दोन हात करणाऱया मराठवाड्याला यंदा पावसाने हिरवे स्वप्न दाखवले होते. मात्र परतीच्या प्रवासात पावसाने घात केला. नगदी पिके हातची गेल्याने शेतकरी रस्त्यावरच आला. याचा फटका साडेपाच लाख शेतकऱयांना बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या या अस्मानी संकटात सापडलेल्या बळीराजाची भेट घेणार आहेत, संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईहून सोलापूर येथे सकाळी 9.30 वाजता विशेष विमानाने आगमन होणार आहे. तेथून सकाळी 10.30 वाजता मोटारीने ते अगोदर काटगावला येतील. शिवारातील नुकसानीची पाहणी करून ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर 11.30 वाजता तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे मुख्यमंत्री येतील. अतिवृष्टीमुळे झालेली पडझड, शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून ते शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 1.00 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहावर प्रशासकीय बैठक घेणार असून त्यानंतर दुपारी 1.30 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे.