
कोरोनामुळे यावर्षी भाविकांना नवरात्रीनिमित्त कळसुबाई शिखरावर येण्यास मनाई आहे. मात्र, काही आदिवासी बांधव आपली दरवर्षीची दर्शनाची परंपरा मोडू नये म्हणून मुख्य मार्गाने शिखरावर न जाता जंगलमार्गाने शिखरावर जाऊन कळसुबाई देवीचे दर्शन घेत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात धार्मिक स्थळे बंद आहेत. राज्यातील नवरात्रोत्सवालादेखील बंधने घालण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसुबाई शिखरावर नवरात्रीत नऊ दिवस यात्रा भरत असते. या ठिकाणी दरवर्षी राज्यभरातून मोठय़ा संख्येने भक्त येत असतात. मात्र, कोरोनामुळे यावर्षी बारी आणि जहागीरदारवाडीच्या ग्रामपंचायतीने कळसुबाई शिखरावर जाण्यास बंदी घातली आहे. बारी आणि जहागीरदारवाडीतील मुख्य मार्गावरून कळसुबाई शिखरावर जाण्यास बंदी असली; तरीही अनेक भाविक इतर मार्गाने शिखरावर जाऊन कळसुबाईचे दर्शन घेत आहेत.
दरवर्षी नित्यनेमाने आदिवासी बांधव आपल्या आराध्य कळसुबाईचे दर्शन घेण्यासाठी हा अवघड डोंगर सर करत असतात. लहानग्यांपासून वयोवृद्धही डोंगरकपारीची
ही अवघड वाट चढतात. यावर्षी मात्र हजारो भाविक नवरात्रीत कळसुबाईच्या दर्शनासाठी येऊ शकले नाहीत.























































